नागपूर : मंगळवारी रात्री पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक संतापले आहेत. दुसऱ्या दिवशी बुधवारी नागरिकांनी अपघातस्थळी आंदोलन केले. युवकाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला आहे. पोलीस घटनास्थळी हजर झाले असून स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.

मंगळवारी शहरात सकाळपासून पावसाचा धुमाकूळ सुरू होता. सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. डिप्टी सिग्नल भागातल्या भुयारी मार्गावर ही घटना घडली होती. महेंद्र फटिंग (१९) असे खड्ड्यात पडून दगावलेल्या तरुणाचे नाव आहे.

महेंद्र हा डिप्टी सिग्नल भागातील भुयारी मार्गावर दुचाकीने जात होता. त्याच वेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने भुयारी मार्गावर पाणी साचले होते. तरीही त्याने गाडी चालवण्याचे धाडस केले. मात्र, साचलेल्या पाण्यात खड्डा न दिसल्याने त्याच्या दुचाकीला अपघात झाला होता. दुसऱ्या दिवशी बुधवारी या घटनेचे संतप्त पडसाद अपघातस्थळी उमटले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते स्थळ बघण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करणे सुरू केले होते.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचे प्राण गेल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करतानाच प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत होते. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास युवकाचा मृतदेह घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवण्याचा प्रयत्न संतप्त जमावाने केला. त्यासोबत तेथे आलेले पोलिसाचे वाहनही अडवण्याचा प्रयत्न संतप्त जमावाने केले. नागरिकांना रोखण्यासाठी सुरक्षा कठडे लावण्यात आले होते ते सुद्धा जमावाने फेकले होते. त्यामुळे तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.