Marbat Festival Focus Issues Terrorism Inflation Corruption : नागपूर : ऐतिहासिक वारसा आणि लोकभावनांचा संगम असलेला नागपूरचा मारबत उत्सव यंदा विशेष गाजणार आहे. शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) साजरा होणाऱ्या या उत्सवात शहरातील विविध मंडळे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रहार करणारे बडगे उभारत आहेत. यावर्षीचे बडगे दहशतवाद, महागाई, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता अशा विषयांवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

महोत्सवातील देखाव्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतीकात्मक पुतळ्यासह काय राहणार? याबाबत आपण जाणून घेऊ या.
अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगामजवळ भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दहशतवाद्यांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर लादलेल्या अवास्तव कराच्या धोरणावरही टीका केली जाणार आहे. त्यामुळे यंदा नागपूरकरांची घोषणाबाजी केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रश्नांनाही स्पर्श करणार आहे. नागपुरातील नेहरू पुतळा चौक, कोतवाली चौक, गांधी पुतळा चौक, व्हीटी पार्क चौक, अमरावती रोडसह विविध भागांतून बडगे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. शहरातील विविध मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या मंडळांनी यंदा मारबत महोत्सवात महागाई, वाढते वीजबिल, स्मार्ट मीटरची समस्या, तसेच वाढत्या व्यसनाधीनतेवर जनजागृती करणारे पुतळे उभारले आहेत. यामधून नागरिकांनी प्रशासन आणि सरकारला दिलेला थेट संदेश लक्षवेधी ठरणार आहे.

मारबत महोत्सवात घोषणा कोणत्या ?

मारबत हा केवळ धार्मिक सण नसून, तो सामाजिक व्यंग आणि जनजागृतीचा मंच आहे. “इडा-पीडा घेऊन जा रे मारबत” अशा घोषणांमधून लोक आपल्या अडचणी, समस्या आणि त्रास यांचे प्रतीकात्मक उच्चाटन करतात. यंदा विशेषतः महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे दुःख, तसेच स्मार्ट मीटरच्या बिलांबद्दलचे असंतोष हे मोठ्या प्रमाणावर व्यक्त होणार आहेत.

मारबत महोत्सवाचे वेगळेपण काय ?

मारबत उत्सवाचे वेगळेपण म्हणजे समाजातील चुकीच्या प्रवृत्तींची थेट खिल्ली उडवून नागरिकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे. यामुळेच प्रत्येक वर्षी नागपूरकरांची आतुरतेने प्रतीक्षा असते. यंदा ट्रम्पपासून ते व्यसनाधीनतेपर्यंत विविध विषयांवरचे बडगे पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अखेरीस, नागपूरचा मारबत उत्सव हा केवळ परंपरेचा भाग नसून सामाजिक जाणीव, लोकसहभाग आणि व्यंगाचा जिवंत उत्सव असल्याचे यंदाही सिद्ध होणार आहे.

मारबत उत्सवाचा इतिहास काय ?

इंग्रजांच्या राजवटीत लोक अत्याचार सहन करत होते. त्यावेळी देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेतून १८८५ मध्ये नागपूरात पिवळी मारबत उत्सव समितीची स्थापना झाली. इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी त्यांच्या दडपशाही आणि अत्याचाराविरुद्ध पिवळी चळवळ सुरू केली होती.