नागपूर : जिथे आजवर कधीच बस पोहोचली नव्हती, त्या तिखाडी गावात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एसटी बस पोहोचली आणि गावकऱ्यांनी एकच आनंद व्यक्त केला. गेल्या कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांनी गावात बसची मागणी केली होती.नागपूर शहर ही राज्याची उपराजधानी, पण स्वातंत्र्यानंतर इतका मोठा कालावधी लोटूनही आणि राज्याची उपराजधानी असूनही जिल्ह्यातील अनेक गावांनी बस पाहिलेली नाही.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील तिखाडी गावात आज अनेक वर्षांच्या मागणीनंतर पहिल्यांदा एसटी पोहोचली आणि गावकऱ्यांचा व विशेषकरून गावातील महिलांचा संघर्ष फळाला आला. तिखाडी, उमरा, दुधा हे गाव चांपा आणि खापरी या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही काही अंतरावर वसलेले गाव आहे. मात्र, या गावांमध्ये आजवर कधीच बस पोहोचली नव्हती.. त्यामुळे इथले गावकरी चांपा खापरी रस्त्यावर जाऊन बस पकडायचे.

मात्र गेले काही महिने खनिज आणि अवैध मुरूम उत्खननाच्या शेकडो ट्रक्समुळे चांपा – खापरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. परिणामी त्या रस्त्यावरील बस वाहतूकही बंद झाली होती. आणि त्या रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या तिखाडी, उमरा, दुधा गावांची अडचण आणखी वाढली होती. या रस्त्यावर एसटी धावत नसल्यामुळे डझनभर गावातील महिलांना एकतर कित्येक किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय किंवा स्वतःची सुरक्षिततेला धोक्यात घालून ट्रक चालकांसोबत ट्रकमध्ये बसून प्रवास करावा लागत होता.

प्रसारमाध्यमांमध्ये हे चित्र समोर आले आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही चांपा ते खापरी दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी देण्याची आणि दिवाळीनंतर त्याचा काम सुरू करण्याची घोषणा केली होती. एसटी प्रशासनानेही समस्येकडे लक्ष घातले होते आणि आजवर कधीच एसटी बस न पोहोचलेल्या तिखाडी, दुधा, उमरा या गावात पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली.

प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा गावात बस पोहोचली, तेव्हा स्वाभाविकरित्या गावकऱ्यांनी बसचे स्वागत तर केलेच, पण प्रशासनाचे आभार देखील मानले. एसटी बस विना डझनभर गावांची होत असलेली अडचण जगासमोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली. म्हणायला ही उपराजधानी असली तरी या जिल्ह्यातील अनेक गावे सोयीसुविधपासून वंचित आहेत. शहरातच रस्त्यांची खस्ता हालत असताना गावातील रस्त्यांचा विचारही न केलेला बरा.