आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढेल, अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी या विधानवरून बावनकुळे यांना चिमटा काढलाय, तसेच एकनाथ शिंदेंना भापजापासून सतर्क राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. नागपूरमध्ये टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले नाना पटोले?
आता तर कुठं सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे चागलं व्हावं, अशीच आमची सदिच्छा आहे. पण भाजपा त्यांचं काय करेल हे आता सांगता येणार नाही. जे बावनकुळेंच्या पोटत होतं, तेच त्यांच्या ओठातून निघालं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
एकनाथ शिंदेंना सतर्क राहण्याचा सल्ला
पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना सतर्क राहण्याच सल्लाही दिला. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलची खोटी बातमी पसरवण्यात आली. विशेष म्हणजे आमच्यात अशी कोणतीच चर्चा झाली नव्हती. पण चुकीच बातमी पसरवून वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, याप्रकरणात तर स्वत: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज त्यांनी यावरून घुमजावदेखील केला. त्यामुळे जे बावनकुळेंच्या पोटात आहे, तेच त्यांच्या ओठावर आलं आहे, हे एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यावं, त्यांनी आता सर्तक राहायला हवं, असेही ते म्हणाले.
भाजपालाही केलं लक्ष्य
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही टीकास्र सोडलं. भाजपा हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. भाजपाकडून सातत्याने लोकांची दिशाभूल करण्यात येते. भाजपाबद्दल आता लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा – “वडिलांच्या निधनानंतर गाय विकायचो आणि..” अजित पवार यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
नेमकं काय प्रकरण?
भाजपाच्या समाजमाध्यम विभागांचे प्रमुख आणि प्रवक्त्यांची मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात नुकतीच एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपावेळी बावनकुळे यांनी सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातल्या २८८ पैकी भाजपा २४० जागा लढवण्याचे नियोजन करणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज सकाळी माध्यमांशी बोलताना सारवासारवदेखील केली.