scorecardresearch

एका प्रदेशाध्यक्षाला यशाने तारले, दुसऱ्यापुढे कर्तृत्वसिद्धतेचे आव्हान

कधीकाळी विदर्भ ज्या पक्षाचा बालेकिल्ला होता तो काँग्रेस आणि आता ज्या पक्षाचा प्रभाव आहे, तो भारतीय जनता पक्ष अशा दोघांचेही प्रदेशाध्यक्ष वैदर्भीय आहेत.

nana patole bawankule
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विदर्भातीलच दोन नेत्यांच्या संघटनात्मक कौशल्याची कसोटी

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : कधीकाळी विदर्भ ज्या पक्षाचा बालेकिल्ला होता तो काँग्रेस आणि आता ज्या पक्षाचा प्रभाव आहे, तो भारतीय जनता पक्ष अशा दोघांचेही प्रदेशाध्यक्ष वैदर्भीय आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणूक निकालाने दोन्ही प्रदेशाध्यक्षांच्या कामाचे मूल्यपामन केले आहे. पक्षांतर्गत वादामुळे अडचणीत सापडलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पक्षातील स्थान या निकालाने बळकट झाले आहे. यातून पक्षांतर्गत विरोधकांवर मात करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. दुसरीकडे पक्षाच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे कर्तृत्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे.

 प्रत्येक पक्षात नेत्यांमध्ये विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशी प्रादेशिक विभागणी आहेच. मागासलेल्या विदर्भाला प्राधान्याने संधी द्या, या मुद्दय़ावर नेते संघटनेत किंवा सत्तेत महत्त्वाच्या पदावर वर्णी लागावी म्हणून प्रयत्नशील असतात. काँग्रेस, भाजप त्याला अपवाद नाही. भाजपने २०१४ मध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्री, ऊर्जामंत्री ही या भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली खाती वैदर्भीय नेत्यांना दिली होती. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर काँग्रेसने वैदर्भीय नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले व नंतर प्रदेशाध्यक्ष केले. त्यानंतर भाजपनेही ऑगस्ट २०२२ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपात पक्षाच्या ओबीसी नेत्यांच्या गळय़ात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली.

दोन्ही प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असल्याने त्यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाची तुलना होणे स्वाभाविक आहे. काँग्रेसने विधान परिषद आणि पोटनिवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याने पटोलेंचे त्यांच्या पक्षात राजकीय वजन वाढले तर भाजपच्या पदरी अपयश आल्याने बावनकुळेंचे ओबीसी कार्ड पक्षाला तारक ठरणारे नाही हे स्पष्ट झाले.

सर्वच राजकीय पक्षात यश-अपयशाचे मूल्यमापन करणारी यंत्रणा असते व ती यासाठी कारणीभूत असणाऱ्या नेत्याचे राजकीय भवितव्य ठरवत असते. साधारणपणे पराभवाचे खापर प्रदेशाध्यक्षांवरच फोडण्याची परंपरा आहे. विजयाचे श्रेय मात्र सत्तेत असलेल्या प्रमुख नेत्यांना दिले जाते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पराभूत झाली असती तर त्याचे सर्व खापर पटोलेंवर फोडून त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी सर्व तयारी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी केली होती. मात्र निकाल पक्षाच्या बाजूने लागल्याने पटोलेंच्या पक्षांतर्गत विरोधकांना गप्प बसावे लागणार आहे.

दुसरीकडे भाजपमध्ये कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे.  विजय झाला तर संघटनात्मक बांधणीमुळे आणि पराभव झाला तर नेतृत्वामुळे. नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि पुण्यातील कसबा या ठिकाणचे पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारे ठरल्याने भाजपमधील बावनकुळे विरोधक तोंड वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर , अमरावती पदवीधर, नागपूर शिक्षक व कसबा मतदारसंघात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. यातून जनता काँग्रेसबरोबर असल्याचे दिसून आले. पुढच्या निवडणुकीत विदर्भात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल.

– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

राज्यात या महिन्यात पक्षात पुनर्रचना केली जाणार आहे. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारल्यावर पुनर्रचना करण्याचा विचार होता. येत्या महिना-दीड महिन्यात ही प्रक्रिया होईल. काही ठिकाणी नवे जिल्हाध्यक्ष येतील.

– चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 00:02 IST
ताज्या बातम्या