नागपूर : विकासाच्या नावावर किती खड्डे खोदले, हे गेल्या  पावसाळ्यात शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने दाखवून दिले आहे, असे विधान करून माजी खासदार नाना पटोले यांनी आगामी निवडणूक प्रचारात गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करण्याचे संकेत दिले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

निवडणूक जाहिरनाम्यात मंदिर बनण्याचे आश्वासन देणारे शहरातील मंदिर तोडतात. जे मंदिर तोडतात, त्यांच्याकडून मंदिर बांधण्याची अपेक्षा नाही. विकास केल्याच्या गप्पा मारतात. त्यांची पोल खोल निर्सगाने केली आहे. ६ जुलै २०१८ ला नागपुरात पूर आला होता. विधिमंडळ कामकाज रद्द करावे लागले होते. त्यामुळे विकासाच्या नावावर किती खड्डे खोदून ठेवण्यात आले. याचा अनुभव नागपूरकरांना आला आहे, असे पटोले म्हणाले.

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान केली, तेव्हाच आपण या दोन्ही नेत्याचे आव्हान स्वीकारले होते. काँग्रेस यांच्याविरोधात आगामी निवडणुकीत ताकदीने लढणार आहे, असे ते म्हणाले.