नागपूर : गैर भाजप पक्षातून रोज कोणी ना कोणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे. जो या पक्षात प्रवेश करीत नाही, त्याच्यावर सरकारी तपास यंत्रणाच्या माध्यमातून कारवाईचा ससेमिरा लावून त्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी बाध्य केले आहे. विरोधी पक्षच संपुष्टात आणण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या भाजप राबवत आहे. त्यामुळे गैरभाजप पक्षात अस्वस्थता आहे, काँग्रेस हा त्यापैकीच एक. पण भाजपच्या कुठल्याही दबावाला भीक न घालता आपला संघर्ष सुरूच ठेवण्याच्या प्रयत्नामुळे आता इतर पक्षातील लोकांनाही आणि काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्यांनाही आता हा पक्ष जवळचा वाटू लागला आहे. इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असताना नंदुरबार जिल्ह्याचे भाजप नेते माजी मंत्री व माजी आमदार पद्माकर वाळवी यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. पद्माकर वाळवी यांनी बुलढाण्यात सपकाळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री व आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “मी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करतो. लवकरच नंदुरबार येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, ज्यात त्यांच्या सहकाऱ्यांचाही काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश होईल.

कोण आहेत पद्माकर वळवी

पद्माकर वळवी यांची राजकीय सुरूवात काँग्रेसमध्येच झाली. ते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी २००९ मध्ये शहादा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. त्या काळात ते महाराष्ट्र सरकारमध्ये क्रीडामंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

भाजपमध्ये प्रवेश

मार्च २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी,वळवी यांनी काँग्रेस सोडली. १३ मार्च २०२४ रोजी मुंबईत त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र भाजपमध्ये त्यांचे मन रमले नाही. धनगरांना आदिवासी समाजाचेआरक्षण देण्याच्याा मुद्यावर त्यांचे भाजप श्रेष्ठींशी मतभेद जाले. त्यामुळे त्यांनी २ ऑक्टोबर २०२४ रोजी भाजपाचा राजीनामा दिला.

परत काँग्रेसमध्ये!

काँग्रेस -भाजप असा प्रवास केल्यावर पद्माकळ वळवी यांनी आज १६ ऑगस्टला काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. हा प्रवेश बुलढाण्यात झाला, भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते पुन्हा स्वगृही परत येत असल्याचा संदेश वळवी यांच्या पक्ष प्रवेशाने गेला आहे. वळवी यांनील राजकीय दृष्टीनं काळाच्या गरजेनुसार, स्थानिक समाजाच्या अपेक्षेप्रमाणे घेतलेल् निर्णय आहे, अशी चर्चा आहे. आदिवासी आरक्षणाचा प्रश्न हा त्यांच्या राजकीय व व्यक्तिगत निर्णयांवर प्रभावी बनलेला आहे. स्थानिक राजकारणात व मतदानावर याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.