नागपूर : सरकारकडून ‘नेत्रदान श्रेष्ठ दान’चा नारा दिला जातो. परंतु, आजही गरजेच्या तुलनेत बुब्बुळ प्रत्यारोपण होत नाहीत. मागील वर्षी राज्यात केवळ ३ हजार ८१३ बुब्बुळ प्रत्यारोपण झाले. सध्या राज्यात ८ हजार ३५१ नेत्रहीन बुब्बुळाच्या प्रतीक्षेत (प्रतीक्षा यादी) आहेत. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

भारतात बुब्बुळाच्या दोषामुळे अंध झालेल्यांची संख्या १ लाख २० हजार आहे. दरवर्षी त्यात २५ ते ३० हजार नवीन रुग्णांची भर पडते. देशात ८० टक्के नेत्रहीन ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. बुब्बुळाच्या नुकसानीमुळे येणारे अंधत्व आपण रोकू शकतो. एकदा बुब्बुळाची पारदर्शकता नष्ट झाली की बुब्बुळ प्रत्यारोपणच करावे लागते. महाराष्ट्रात २०२४-२५ या वर्षात ६ हजार ६५३ बुब्बुळ विविध नेत्रपेढींना दान स्वरूपात मिळाले. त्यापैकी ३ हजार ८१३ नेत्रहीनांना बुब्बुळ प्रत्यारोपणाने नवीन दृष्टी मिळाली. शिल्लक बुब्बुळाचा दर्जा कमकुवत असल्याने ते शैक्षणिक व संशोधनात्मक कामासाठी वापरले गेले.

दरम्यान राज्यातही उपलब्ध बुब्बुळांची संख्या कमी असल्याने आजही ८ हजार ३५१ नेत्रहीन बुब्बुळाच्या प्रतीक्षेत आहेत. नेत्रदान वाढल्यास या सगळ्यांना नवीन दृष्टी मिळणे शक्य आहे, अशी माहिती मंगळवारी नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील नेत्र विभागात झालेल्या पत्रकार परिषदेत नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. नंदकिशोर राऊत यांनी दिली. दरम्यान भारतात प्रत्येक वर्षी ९५ लाख नागरिकांचा विविध कारणांनी मृत्यू होतो. त्यानंतरही नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. ही संख्या वाढल्यास मोठ्या संख्येने नेत्रहीनांना नवीन दृष्टी मिळणे शक्य असल्याचेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणने काय ?

भारतात प्रत्येक वर्षी सुमारे ९५ लाख जणांचा विविध कारणांमुळे मृत्यू होतो. त्या तुलनेत नेत्रदान करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. समाजाने पुढे येत नेत्रदानासह अवयदानाची चळवळ राबवल्यास अनेकांना जीवदान मिळेल. नेत्रहीनांनाही बुब्बुळाची प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी माहिती नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नंदकिशोर राऊत यांनी दिली.

नेत्रदान पंधरवाड्याच्या पहिल्याच दिवशी दोघांना नवीन दृष्टी

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन व्यक्तींनी जगाचा निरोप घेताना मेडिकलच्या नेत्रपेढीला नेत्रदान केले. त्यातून उपलब्ध बुब्बुळाचे दोन नेत्रहीनांमध्ये यशस्वी प्रत्यारोपण झाल्याने त्यांना नवीन दृष्टी मिळाली. यशस्वी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमध्ये एका २८ वर्षीय तर दुसऱ्या ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या २८ वर्षीय रुग्णामध्ये मेडिकलमध्येच काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.