अमरावती : “अमरावती विमानतळावरून गेल्या काही दिवसांपासून विमानांचे उड्डाण रद्द होण्याच्या घटना घडल्या आहेत. या विमानतळावरून उडान योजनेअंतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानाच्या एकूण प्रवासी संख्येच्या पन्नास टक्के प्रवाशांसाठी आमचे सरकार अनुदान देते. पण, जेव्हा येथील व्यापारी किंवा उपचारासाठी जाणारे रुग्ण तातडीच्या कामांसाठी विमानाच्या तिकिटांचे बुकिंग करतात, तेव्हा काही वेळा विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचे त्यांना कळते. या अमरावती विमानसेवेसाठी सुमारे ९ ते १० हजार रुपये प्रवास भाडे बुकिंगच्या वेळी दिसते. हा प्रकार काय आहे,” अशी विचारणा भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक स्वाती पांड्ये यांना फोनद्वारे केली.
गेल्या काही दिवसांत अमरावती-मुंबई विमान सेवा तांत्रिक बिघाडात अडकलेली आहे. यामुळे सामान्य विमान प्रवासी खूपच त्रस्त झालेले आहेत. दुसरीकडे, एमएडीसी किंवा अलायन्स एअरने हवाई सेवा आणि उड्डाणांबद्दल माहिती देण्यासाठी कोणताही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे चौकशी केली तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात. अशा परिस्थितीत, तांत्रिक कारणांमुळे वारंवार उड्डाणे रद्द करणे आणि नंतर सीट चार्जच्या नावाखाली मोठी रक्कम कापून त्या बदल्यात खूप कमी रक्कम मिळणे यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात बेलोरा येथील अमरावती विमानतळाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात काही काळासाठी नियमित उड्डाणे निश्चित दिवशी चालवली जात होती. परंतु त्यानंतर अलायन्स एअरने विविध तांत्रिक कारणे सांगून अचानक उड्डाणे रद्द करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अमरावती शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना विमानाने मुंबईला ये-जा करण्यात खूप गैरसोय होऊ लागली.
ज्यांनी अमरावती-मुंबई विमानसेवेसाठी आधीच तिकिटे बुक केली आहेत आणि विमानसेवा रद्द झाल्यावर त्यांना त्यांचे प्रवासाचे नियोजन रद्द करावे लागते किंवा प्रवासासाठी इतर पर्याय शोधावे लागतात. तसेच, विमानसेवा रद्द झाल्यावर सीट चार्जच्या नावाखाली त्यांनी भरलेल्या रकमेतून सुमारे एक हजार रुपये कापले जातात आणि उर्वरित रक्कम परत केली जाते. हे विमान प्रवाशांचे थेट आर्थिक नुकसान आहे. गेल्या १६ जून रोजी मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा रद्द करण्यात आली होती. ज्यासाठी काही प्रवाशांनी अमरावती-मुंबई प्रवासासाठी प्रवास तिकिटे खरेदी केली होती परंतु तांत्रिक कारणांमुळे तिकिटे रद्द करण्यात आली.