गडचिरोली : राज्याच्या सीमेपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले असून त्यांच्यामध्ये देशातील सर्वात मोठा नक्षलवादी नेता नंबाला केशवराव ऊर्फ बसवराजू (७०) याचा समावेश आहे. या कारवाईत छत्तीसगड पोलिसांचा एक जवान शहीद झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर (ट्राय जंक्शन) अबुझमाड व इंद्रावती राष्ट्रीय उद्यान जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. विविध राज्यांत मिळून पाच कोटीहून अधिकचे बक्षीस असलेला नक्षल्यांचा सर्वोच्च नेता, सरचिटणीस तथा ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य नंबाला केशव रावदेखील तेथेच असल्याचे समजले होते. २० मे रोजी रात्री दंतेवावाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागांव जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केले. बुधवारी सकाळी नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात २७ नक्षलवादी ठार झाले. तर छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचा एक जवान चकमकीत शहीद झाला. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून यात आणखी काही मोठे नेते असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळावरून आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती आले असून ही संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यशाबद्दल आपल्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे. माओवाद संपवून जनतेला शांततामय जीवन जगता यावे तसेच प्रगती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान