सरकारविरोधात मते व्यक्त करणारे पत्रकार, राजकीय नेते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि विद्यार्थ्यांना ‘यूएपीए’, देशद्रोहसारख्या कायद्याखाली अटक करून तुरुंगात डांबणाऱ्या केंद्र सरकारविरोधात समाजातील सर्व गटाने एकत्र यावे, असे आवाहन नक्षल्यांच्या मध्य रिजनल कमिटीचा प्रवक्ता प्रताप यांने पत्रकाच्या माध्यमातून केला आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाले आहे.आठ वर्षांपूर्वी सत्तेत आलेले नरेंद्र मोदी यांचे फॅसिस्ट सरकार देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवत आहे. विरोधात मते व्यक्त करणाऱ्यांना बंदी बनवण्यात येत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणामध्ये कारागृहात टाकण्यात आलेले वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, अरुण फरेरा, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर धावडे, सुरेंद्र गडलिंग, यासारख्या असंख्य नागरिकांचा कोणतेही पुरावे नसताना केवळ कायद्याचा दुरुपयोग करून छळ करण्यात येत आहे. त्यांच्या जामिनाच्या अधिकाराचेदेखील हनन होत आहे.

हेही वाचा – नागपुरात दुचाकी टॅक्सीविरोधात कार टॅक्सी चालक रस्त्यावर

९० टक्के अपंग असलेल्या प्राध्यपक साईबाबाला देखील अशीच वागणूक देण्यात येत आहे. दुसरीकडे, गुजरात दंगलीतील आरोपींना सोडून त्याविरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या तिस्ता सेतलवाडसारख्या व्यक्तींना आत टाकण्यत आले. सरकारकडून पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांची पोलखोल कारणारा अल्ट न्युजचा संपादक मोहम्मद जुबेरला देखील जुन्या प्रकरणात आत टाकण्यात आले. न्यायव्यवस्था खिळखिळी करण्यात आली, असे नक्षल्यांनी १९ ऑगस्ट रोजी काढलेल्या या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.गेल्या २० वर्षात देशातील कारागृहात १८८८ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाला, असा दावाही या पत्रकात करण्यात आला आहे. देशावर बेरोजगारी, महागाई आणि गरिबी लादून नागरिकांना मरणाच्या खाईत लोटण्याचा प्रकार सुरू असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे म्हणजे सामान्यांची थट्टा करण्याचा प्रकार असून आम्ही याचा बहिष्कार करतो, असेही पत्रकात म्हटले आहे.

नर्मदाक्का आणि फादर स्टेन स्वामी यांची संस्थात्मक हत्या
माओवादी चळवळीची माहिला नेता नर्मदाक्का हिचा ९ एप्रिल रोजी मुंबईतील तुरुंगात उपचाराअभावी मृत्यू झाला. फादर स्टेन स्वामीसारख्या वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्त्यावर देखील योग्य उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे दोघांचाही कारागृहात मृत्यू झाला. ही संस्थात्मक हत्या असल्याचेही नक्षल्यांनी पत्रकात म्हटले आहे.