अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला या पेसा ग्रामसभेच्या माध्यमातून यावर्षी करण्यात आलेल्या तेंदूपत्ता हंगामात ११ रुपये प्रती शेकडा या दराने तेंदुपत्तातील रक्कम ही नक्षल्यांच्या भाषेत जनतेला अर्थात नक्षल्यांना देण्याचा तोंडी करार झाला होता. मात्र या कराराची १७.५० लाख रुपयाची रक्कम ग्रामसभेने जनतेला अर्थात नक्षल्यांना न दिल्याने नक्षलवाद्यांच्या अहेरी एरिया समितीने एक पत्रक काढून ग्रामपंचायत चौकीदार व इतर नागरिकांना शिक्षा देण्याची धमकी देत १७.५० लाख रुपये वसूल करण्याचे आव्हान दिले आहे. या पत्रकामुळे खांदला ग्रामपंचायत परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पत्रकात नक्षल्यांनी असे म्हटले आहे की तेंदूपत्त्याचे ११ रुपये जनतेला मिळणार होते. परंतु हे पैसे ग्रामसभेचे लोक आणि व्यंकटेश अलोणे या ग्रामपंचायतच्या चौकीदाराने ठेकेदाराची दिशाभूल करून पैसे हडप केले आहे. त्यामुळे सदर चौकीदार व ग्रामसभेचे संदू पेंदाम रा. खांदला, दुर्गा आलाम रा. पत्तीगाव, भगवान मडावी रा. चिरेपली, पांडू गावडे रा. मटनेली, माधव कुडमेथे रा. टायगट्टा, बिच्चू मडावी गोलाकर्जी या सर्व लोकांना माओवादी शिक्षा देऊन १७.५० लाख रुपये वसूल करणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात माओवादी ग्रामसभा घेणार असून सर्व लोकांना ग्रामसभेत उपस्थित होण्याचे फर्मान नक्षल्यांनी काढले आहे. अशीच कारवाई राजाराम ग्रामपंचायत मध्ये सुद्धा करण्यात येणार असल्याचे नक्षल्यांनी म्हटले आहे. या संदर्भात अद्याप पोलीस तक्रार झालेली नसल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxals threaten rajaram khandala gram sabha gadchiroli accused embezzling naxals amy
First published on: 23-05-2022 at 22:49 IST