नागपूर :   गेल्या काही दिवसात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा पोपट बोलत आहे. प्रसार माध्यमासाठी ते महत्त्वाचे असले तरी आमच्यासाठी नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर टीका केली.  फडणवीस शुक्रवारी सकाळी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्यात अडकला आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला होता. यावर राष्ट्रवादीचा पोपट रोज प्रसारमाध्यमासमोर बोलत आहे ना, असा प्रतिटोला फडणवीस यांनी हाणला. कोण कोणाचा पोपट आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. भाजपसाठी नाही, असेही फडणवीस म्हणाले.

वानखेडेंना अटक झाली तर भाजपला धोका असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यावर आम्हाला कुठलाही धोका नाही. वानखेडेच्या विषयावर ते दिवसभर काहीतरी बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही, असे सांगत फडणवीस यांनी मलिक यांच्या विधानावर अधिक बोलणे टाळले.

भविष्यवाणीचा धंदा फडणवीसांचा – मलिक

 पोपटाचा धंदा माझा नाही, तो देवेंद्र फडणवीसांचा आहे. त्यांचा पोपट चिठ्ठ्या  काढतो आणि ते भविष्यवाणी करत असतात. ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ  शकतात. नवाब मलिक पोपट होऊ  शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी नागपुरात प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतो, अशी टीका केली होती. त्याबद्दल मलिक यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने १०० पेक्षा जास्त लोकांना २६ बनावट प्रकरणात अडकवले आहे, एनसीबीचे अधिकारी बनावटरित्या लोकांना अडकवत असतील. हजारो कोटींची खंडणी वसूल करत असतील तर तर माझे काम आहे त्यांना अडवले पाहिजे, ते कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत करेन.