राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विश्वास

भाजपसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि ते पाच वर्षे टिकेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी पवार नागपूर जिल्ह्य़ाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत चर्चा सुरू आहे काय, या प्रश्नावर पवार म्हणाले, शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कोणाशीही चर्चा सुरू नाही. राज्यात स्थिर सरकार असावे आणि राज्यातील यक्ष प्रश्न सोडण्यात सरकार यशस्वी व्हावे, असे आम्हाला वाटते. परंतु ते सरकार आज किंवा उद्या स्थापन होईल, असे मी सांगू शकत नाही. मात्र राज्यासाठी जे काही योग्य असेल ते करण्याची आमची इच्छा आहे.

राज्यातील जनतेने कोणालाही पूर्ण बहुमत दिले असते तर आज चर्चा करण्याची वेळच आली नसती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. सरकार चालवताना धर्मनिरपेक्षतेसाठी आम्ही आग्रही राहू. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. सरकार केव्हा स्थापन होईल, हे सांगता येणार नाही. मात्र, मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता नाही. राज्यात सरकार स्थापन होईल आणि ते पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.

राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळतील काय, असे विचारले असता यासंदर्भात कोणताही विचार नाही. ज्याची मुख्यमंत्री पदाची मागणी आहे, त्यावर विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

अन् पवार म्हणाले,  मी पुन्हा येईन..

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपचेच सरकार येईल; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी सरकार स्थापन केल्यास ते सहा महिनेदेखील टिकणार नाही, असे म्हटले होते. पवार या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाले, सध्या तरी माझ्या डोक्यात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकेच आहे. मी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आताच कळले, असा टोलाही लगावला.

मी क्रिकेटमध्ये प्रशासक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. कधी कधी आपण मॅच हारत आहोत, असे वाटत असताना अचानक निकाल वेगळा लागतो, असे विधान केले. त्यावर पवार यांनी मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, मी क्रिकेट खेळत नाही, अशा शब्दांत गडकरी यांना टोला लगावला.