राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन;माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा नागरी सत्कार
प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदी असताना शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजनांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व राज्यातील कृषी मंत्र्यांची बैठक राष्ट्रपती भवनात बोलावली होती. त्या बैठकीतील टिप्पण त्यांनी पंतप्रधानांना पाठवले. धोरणात बदल करण्याची सूचना केली. अशाप्रकारे देशाच्या पोशिंदाची जबाबदारी असलेल्या कृषी मंत्र्यांची बैठक राष्ट्रभवनात पहिल्यांदाच झाली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राच्या वतीने बुधवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत उपस्थित होते.
पवार म्हणाले, शेतीविषय प्रश्नांवर संवेदनशील असल्याचा परिचय पाटील यांच्या एका कृती दिसून आला. त्या बैठकीत शेतकऱ्यांची स्थिती, शेतीविषय समस्या आणि त्या दूर करण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा घडवून आणली. मी त्यावेळी केंद्रीय कृषीमंत्री होतो. यापूर्वी राष्ट्रपती भवनात कृषी मंत्र्यांची बैठक झाली नाही, असेही पवार म्हणाले.
प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती असताना तीनही दलाच्या सरसेनापती म्हणून सुखोई विमानातून उड्डाण करून इतिहास घडवला. रशियाने या विमानाची निर्मिती केल्यानंतर आणि तो भारतात आल्यानंतर पहिल्यांदा एखादी महिला त्यात बसल्याचा मान त्यांनी मिळवला. राष्ट्रपती म्हणून देशातच नव्हेतर देशाबाहेरील अनेक देशात भारताची प्रतिमा उंचावण्याची खबरदारी त्यांनी घेतली, असेही पवार म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेही भाषण झाले.
मीच मातोश्रीवर घेऊन गेलो
शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारण दूर ठेवून महाराष्ट्राची कन्या म्हणून प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समर्थन दिले. आपणच त्यांना मातोश्रीवर घेऊन गेल्याची आठवण पवार यांनी सांगितली.