लोकसत्ता टीम

गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे बिनीचे शिलेदार माजी खासदार मधुकर कुकडे शरद पवार गटात सामील झाले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कुकडे यांनी केलेले पक्षांतर प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी धक्कादायक मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भंडाऱ्यात तातडीची बैठक होती. या बैठकीत माजी खासदार मधुकर कुकडे हजर होते. ‘‘शरद पवार हे जगातील पहिले नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. शरद पवार कृषिमंत्री असताना खताचे भाव वाढले नाहीत. मात्र, आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळेच मी त्यांच्या विचारधारेसोबत आहे’, अशी प्रतिक्रिया मधुकर कुकडे यांनी यावेळी दिली.

आणखी वाचा- नागपूर लोकसभा: काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या होकारामागे कोणाचे बळ?

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. माढा लोकसभा मतदार संघात महादेव जाणकार यांना मविआकडून तिकीट असो किंवा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांचा पक्षप्रवेश, तर बीडमध्ये बजरंग सोनावणे यांचा पक्षप्रवेश, या घडामोडी घडत असतानाच शरद पवारांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातही मी काय करू शकतो, हे प्रफुल्ल पटेल यांना दाखवून दिले आहे. आजघडीला भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे दोन माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आहेत. माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी आधीच शरद पवार गटात प्रवेश केला होता, तर दुसरे माजी खासदार म्हणून आता मधुकर कुकडे यांचा शरद पवार गटात झालेला प्रवेश प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे.