वर्धा : कथित भ्रष्टाचाराचा आरोप करीत आंदोलकांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस चक्क नवरदेवाचे बाशिंग बांधले व ढोलताशांच्या निनादात गावभर वरातही काढली. आंदोलकांनी स्वत:ला फटके मारून भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले. भाजपाची सत्ता असणाऱ्या आर्वी पालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे करीत आहे.
हेही वाचा >>> यवतमाळमध्ये जमिनीत झाला स्फोट! भूमिगत पाईपलाईन फुटली अन्…; थरकाप उडवणारा Video एकदा पाहाच
कामगारांना मजुरी नाही, अंदाजपत्रकानुसार कामे नाही, चुकीची कामे होतात असे व अन्य आरोप केले जात आहे. याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे पोटफोडे म्हणाले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही वरात वाजतगाजत निघाल्याने नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. शेवटी भ्रष्टाचाऱ्यांना चाबूक हाणा म्हणत आंदोलकांनी स्वतःवर आसूड ओढले. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात घनकचरा कंत्राट, वाहतूक, प्रक्रिया कंत्राट, मनुष्यबळ पुरवठा आदींबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.