नागपूर : लंडनसारख्या देशात जाऊन एक, दोन नाही तर तब्बल चार कार्यक्रमांची मागणी होणं ही कोणत्याही कलाकारांसाठी अभिमानाचीच बाब आहे. सगळ्यांच कलाकारांच्या स्वप्नाला लंडनचे पंख मिळतील असे नाही. मात्र, एका वैदर्भीय कन्येने ही कामगिरी करून दाखवली आहे. “ठोंबरे बाई” या नावाने परिचित असलेली आणि खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणारी नेहा ठोंबरे याबाबतीत नशीबवान ठरली आहे. तिची मेहनत तिला लंडनच्या रंगभूमीवर घेऊन गेली आहे आणि एका शो साठी गेलेली नेहा ठोंबरे आता लंडनमध्ये तब्बल चार “स्टॅण्डअप कॉमेडी शो” करणार आहे.

लंडनच्या प्रतिष्ठित रंगमंचावर आपल्या विनोदी शैलीने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी नेहा ठोंबरे सज्ज झाली असून आज तिचा पहिला शो आहे. विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला विनोदी कलाकार म्हणून लंडनमध्ये परफॉर्म करण्याची नेहाला मिळालेली ही संधी संपूर्ण भारतीय कलाविश्वासाठी अभिमानास्पद आहे.

नेहा ठोंबरेने आपल्या खास विदर्भीय ढंगातील आणि अस्सल विनोदी अंदाजाने महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हक्काचे स्थान मिळवले आहे. सामाजिक विषयांवरील तिचे मार्मिक आणि खुमासदार भाष्य, तसेच दैनंदिन जीवनातील गमती जमतींना सहज सोप्या वैदर्भीय भाषेत विनोदी अंदाजात सादर करण्याची तिची कला रसिकांना नेहमीच आवडली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात तिच्या परफॉर्मन्सचा एक किस्सा सांगितला होता. ‘ठोंबरे बाई’ याच नावाने नेहा अधिक लोकप्रिय आहे. ९ मे रोजी लंडनमधील एका नामांकित नाट्यगृहात तिचा पहिला कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून, लंडनमधील मराठी बांधवांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे. नेहा ठोंबरे ( ठोंबरे बाई ) हिने आपल्या अनोख्या हास्यशैलीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. मराठी स्टैंडअप कॉमेडीचे कार्यक्रम अगदी तुरळक स्वरूपात होतात, तेही मुलगी स्टैंडअप सादर करत असलेले कार्यक्रम अभावानेच पाहायला मिळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीतही नागपूरची नेहा ठोंबरे ही तरुणी आपला वेगळा ठसा उमटवू पाहत आहे. वऱ्हाडी भाषेतील तिची कॉमेडी आणि तिच्या या ठसकेबाज कॉमेडीचा वेगळा चाहतावर्ग आहे. आता हीच वऱ्हाडी कॉमेडी थेट लंडनमधील मराठी भाषिकांना अनुभवता येणार आहे. म्हणजेच नेहाचे स्टॅन्डअप कॉमेडीचे कार्यक्रम लंडनमध्ये सादर होणार आहेत. परदेशात वऱ्हाडी भाषेत कॉमेडी सादर करणारी ती पहिलीवहिली महिला स्टॅन्डअप कॉमेडीयन ठरणार आहे. नेहाचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नाही. एका छोट्या गावातून येत तिने हे मोठे स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले. तिच्या भाषेवरून जेव्हा पुण्यासारख्या शहरात ती शिकत असताना तिला ट्रोल केले गेले, त्यावेळी हीच वैदर्भीय भाषा तिने आपली ताकद बनवली. अभियंता असलेला आणि सरकारी नोकरीत असलेल्या नेहाचा हा प्रवास निश्चितच वैदर्भीयांसाठी अभिमानास्पद आहे.