अमरावती : आपल्या ग्रहमालेतील शेवटचा नेपच्यून ग्रह येत्या २३ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार आहे. याला खगोलीय भाषेत प्रतियुती असे म्हणतात. एवढेच नव्हे तर हा ग्रह सूर्याच्याही जवळ येणार आहे. प्रतियुतीदरम्यान ग्रहांचे अंतर पृथ्वीपासून नेहमीच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांना या ग्रहांचे निरीक्षक योग्यप्रकारे करता येते. नेपच्यून ग्रह हा २३ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार असल्यामुळे शहरातील खगोलप्रेमी व शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनाही या ग्रहाचे दर्शन घडवण्याचा काही खगोलप्रेमींचा मानस आहे.

सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी नेपच्यून ग्रहाला १६५ वर्षे लागतात. तसेच हा ग्रह १६ तासात स्वत:भोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ रोजी जर्मन खगोलशास्त्रही गॅले आणि लव्हेरिया या वैज्ञानिकांनी लावला होता. नेपच्यून या ग्रहाला १३ चंद्र असून येथील वातावरणात मिथेन वायू असल्यामुळे तो निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८ हजार ६०० कि.मी. आहे. या ग्रहाचे पृष्ठभागाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सिअस आहे. २४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर-२ हे मानवरहीत यान नेपच्यून जवळून गेले होते. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर ४५२ कोटी कि.मी. आहे.

वर्षभरात कोणता ना कोणता ग्रह हा पृथ्वीच्या जवळ येत असतो. परंतु, काही ग्रह हे बऱ्याच कालावधीनंतर पृथ्वीच्या जवळ येतात. त्यामुळे अशा घटनांना दुर्मिळ घटना समजले जाते. कधी युती-प्रतियुतीही होत असते. या घटना खगोल प्रेमींसह विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धनासाठी उपयोगी ठरतात.

रात्रभर आकाशात पर्वणी

ढगाळ वातावरण निवळले तर २३ सप्टेंबर रोजी रात्रभर फिक्कट निळ्या रंगाच्या नेपच्यून ग्रहाला दुर्बिणीच्या माध्यमातून बघता येईल. हा ग्रह आकाशात ठिपक्याप्रमाणे लहान दिसत असल्यामुळे तो उघड्या डोळ्यांनी बघता येणार नाही. मात्र नेहमीच्या तुलनेत पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे दर्जेदार दुर्बिणीतून त्याची निरीक्षण करता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल तज्ज्ञ विजय गिरुळकर यांनी दिली आहे.

२३ सप्टेंबरला हा ग्रह सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशात दिसेल. या ग्रहाच्या निरीक्षणासाठी शक्तीशाली दुर्बिणीची आवश्यकता आहे. याआधी हा ग्रह १९ सप्टेंबर २०२३ रोजी पृथ्वीच्या जवळ आला होता, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेतर्फे देण्यात आली आहे.