यवतमाळ : ‘प्रेम करावं भिल्लासारख, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं…’, कुसुमाग्रजांनी प्रेमातली ही आर्तता मांडली आहे. पण, नेर शहरात पर जिल्ह्यातील एका युवा नेत्याच्या मनात उगवलेले प्रेम थेट बॅनरवर पोहचले. मात्र ते ‘तिच्या’ मनापर्यंत पोहोचण्याआधीच गावभर बोभाटा झाला. अखेर पोलिसांनी चर्चेत आलेले ते बॅनर रात्री बरोब्बर १०:१० च्या ठोक्याला हटविले.
नेर शहरात सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अमरावती–यवतमाळ रोडवरील शिवाजी शाळेसमोर अचानक एक भलेमोठे बॅनर झळकले.
त्यावर गुलाबी हृदय, ‘आय एम वेटींग’ आणि कोपऱ्यात रहस्यमय ‘व्ही’ हे एकटं आद्याक्षर लिहिलेलं होतं. हा काय प्रकार आहे, हे कोणालाच कळत नव्हते. 
सोशल मीडियावर फोटो क्षणात व्हायरल झाले. गावात चर्चेला उधाण आले. कोणी आणि कोणासाठी हे बॅनर लावले असावे? याचा अंदाज प्रत्येकजण बांधू लागला. ‘व्ही’ म्हणजे कोण? वैभवी, वंदना की वैष्णवी? की, हा व्हॅलेंटाईनचा ‘व्ही’, असा अंदाजांचा फड सुरू झाला. नेरकरांना वाटत होते, आता कुठूनतरी हिरो येणार, शहनाई वाजणार, आणि चित्रपटातल्यासारखं प्रपोजल होऊन कथेचा सुखांत होणार. पण, पटकथा वेगळीच लिहिली होती. कोणीतरी या बॅनरची माहिती पोलिसांना दिली. अगदी १० वाजून १० मिनिटांनी, नेर पोलिसांची घटनास्थळी झटक्यात एन्ट्री झाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बॅनर काढले, जागा रिकामी केली.
चौकशीत समजलं की, हा काही साधासुधा रोमान्स नव्हता. यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघात ‘घड्याळाच्या काट्यावर’ राजकारण करणाऱ्या एका तरुण राजकीय नेत्याने हा प्रकार केल्याचे पुढे आले. नेरमध्ये लग्न होऊन आलेल्या आपल्या प्रेयसीकरिता त्याने ही बॅनरबाजी केल्याची चर्चा रंगली आहे.
युवा वयातच राजकारणात विविध पदे अनुभवलेल्या, सभापती राहिलेल्या लगतच्या जिल्ह्यातील या तरुणाचा जीव नावात ‘व्ही’ आद्याक्षर असलेल्या तिच्यात अडकला असावा. त्याने याची कल्पना तिला दिली असावी. मात्र तिच्याकडून त्याला उत्तर मिळाले नव्हते. तिच्या उत्तराची प्रतीक्षा फार काळ करू शकत नसल्याने अखेर त्याने ही बॅनरबाजी केली, अशी चर्चा रंगली आहे. त्याच्या राजकारणाप्रमाणेच त्याच्या बालीश प्रेमाची ही गोष्टही सामाजिक झाली! प्रेम, पॉलिटिक्स आणि या पब्लिक तमाशाची चर्चा आता पंचक्रोशीत रंगली आहे.
बॅनर लावा पण…
ते वादग्रस्त बॅनर पोलिसांनी रात्रीच काढून टाकले. त्यानंतर स्थानिक बॅनर व्यावसायिकांना बीएनएस १६८ नुसार नोटीस देखील दिली. सामाजिक सलोखा बिघडणार नाही सोबतच एखाद्याची व्यक्तिगत बदनामी होणार नाही, याची दक्षता घेऊनच बॅनर लावावे असे बजावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
