नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंग्याचा फोटो लावला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा तिरंगा फडकवतानाचा फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणून लावलाय. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही तोच फोटो आपल्या प्रोफाईलवर लावला आहे. पण आता याच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवरून नवा वाद सुरू झाला आहे. हिंदुत्ववादी संघटना आरएसएस तिरंगा विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर खरच तिरंगा ध्वज फडकवला जात नाही का? या संदर्भात खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनीच माहिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. तसेच नागपूरच्या रेशीमबाग येथे संघ परिवारातील डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचे कार्यालय आहे. संघाचे अनेक कार्यक्रम याच कार्यालयात होतात. मात्र महाल परिसरातील संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मारक समिती कार्यालयांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी कधीच तिरंगा ध्वज फडकवला जात नव्हता, असा आरोप अनेकदा केला जातो. नागपूर मधील अग्रसेन छत्रावासमध्ये काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या दरम्यान एका विद्यार्थ्याने मोहन भागवत यांना या संदर्भात प्रश्न विचारला त्यावर भागवत काय म्हणाले पहा..
सरसंचालक नेमके काय म्हणाले
आम्ही दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ज्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवतो. नागपुरात महाल आणि रेशीमबाग येथे दोन कार्यालय आहेत. या दोन्ही ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. हा प्रश्न आम्हाला लोकांनी विचारायला नको. स्वतंत्र भारताचा झेंडा तिरंगी रंगाचा आणि काँग्रेसचाही तिरंगी रंगाचा झेंडा होता. त्या काळात सर्वात मोठी राजकीय पार्टी काँग्रेस होती. १९३३ मध्ये जळगाव जवळील फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले. या ठिकाणी पहिल्यांदा ऐंशी फूट उंच खांबावर झेंडा लावून तो फडकवण्याचा निर्णय झाला. यावेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातात दोरी देऊन झेंडा फडकवायला दिला. मात्र तो झेंडा अर्ध्यात अडकला. झेंडा अडकल्यामुळे तो सोडवायला एक तरुण पुढे आला. तो वरती चढला आणि त्याने झेंडा फडकवला. यावेळी उपस्थित लोकांनी त्याचा जयजयकार केला.
जवाहरलाल नेहरूंनीही त्याचे कौतुक करत उद्या अधिवेशनात ये तुझा सत्कार करू असे निमंत्रण दिले. मात्र त्यानंतर हा मुलगा संघाच्या शाखेत जातो असे काँग्रेसच्या अधिवेशनात माहिती झाले. ही गोष्ट डॉक्टर हेडगेवार यांना माहिती झाली. ते प्रवासात असताना तिथून त्या मुलाला भेटायला गेले. त्यांचे नाव होते किसन सिंग राजपूत. हेडगेवार यांनी त्याला भेटवस्तू देऊन त्याचे कौतुक केले होते. आठ वर्षाआधी त्यांचे निधन झाले. त्यामुळे पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवण्याची गोष्ट आल्यापासून तर आतापर्यंत आम्ही ध्वज फडकवण्यात अग्रेसर राहिलेलो आहे. आणि केवळ ध्वज फडकवण्याचीच गोष्ट नाही तर जिथे जिथे आपल्या तिरंगा ध्वजावर आणि देशावर संकट येईल तिथे तिथे आम्ही आमचे प्राणही द्यायला तयार आहोत असेही भागवत यांनी सांगितले.