प्लास्टिक वापरावर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारने प्लास्टिक पॅकेजिंग करणाऱ्या उत्पादकांकरिता नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. या नव्या नियमानुसार प्लास्टिक पॅकेजिंगपासून तयार होणाऱ्या कचऱ्याच्या नियोजनासाठी आराखडा तयार करावा लागेल. मात्र, एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात सरकार अपयशी ठरले असताना  या नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचे काय होणार, असा प्रश्न या नव्या निर्णयानंतर उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे उत्पादकांची जबाबदारी वाढली आहे. या माध्यमातून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याकरिता निर्बंध घातले जाणार आहेत. येत्या १ जुलैपासून देशात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा स्तर कमी करण्याचा प्रयत्न आहे. एकदाच वापरल्या जाणारे प्लास्टिक उपयोगाचे नसून त्याचा कचरादेखील मोठय़ा प्रमाणात होतो. या मार्गदर्शक तत्त्वांमागील सरकारचा उद्देश चांगला असला तरीही अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे. पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक  कचऱ्याच्या पुनर्वापरावर भर दिला जाणार आहे. यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होऊन प्लास्टिकच्या नव्या पर्यायाच्या विकासाला चालना मिळेल. पुनर्वापराकरिता गेलेल्या प्लास्टिकला वारंवार उपयोगात आणले जाईल. यामुळे प्लास्टिकची विक्री कमी होईल. विक्री कमी झाली तर उत्पादनही कमी होईल. ऑनलाईन प्लॅटफार्मच्या माध्यमातून कामाची पाहणी करण्यात येईल. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्यास किंवा प्रदूषण झाल्यास उत्पादकांवर पर्यावरण नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल. त्यांना दंड ठोठावण्यात येईल. या मार्गदर्शक तत्त्वांचा मूळ उद्देशच पर्यावरणाची गुणवत्ता सुधारणे, पर्यावरणाची सुरक्षा आणि प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांवर अंकूश ठेवणे आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची जबाबदारी राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांवर असेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New guidelines on plastic ban abn
First published on: 19-02-2022 at 01:25 IST