नागपूर : भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामीळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांगांमधील घनदाट जंगलात ही पाल त्यांना आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते. साधारणपणे समुद्र सपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या या डोंगर भागातील घनदाट जंगलात २०१३ पासून संशोधनाचे काम चालू होते. या जंगलात अनेक लहानमोठे हिंस्त्र प्राणी आहेत. येथे राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे झाडाखाली राहात जेवढे सामान सोबत नेले, तेवढ्यावरच संशोधकांनी गुजराण केली.
२०१५ ला अमित सैय्यद व त्यांच्या चमुला यश आले आणि ही पाल सापडली. त्यानंतर या पालीवर प्रयोगशाळेत संशोधन करून त्याच्या सर्व अवयवांचा, त्याच्यावर असणाऱ्या खवल्यांचा व जनुकीय अभ्यास अमितने सुरू केला. शास्त्रीय अभ्यासातून नक्की झाले की ही पाल नवीन असुन वन्यजीवशास्त्रात याची अजूनही नोंद नाही. अमित सैय्यद यांनी या पालीला आपल्या वडिलांचे नाव द्यायचे ठरवले. प्रो. रशीद सैय्यद हे अमितचे वडील असून ‘निमाम्स्पिस रशिदी’ असे या पालीचे नाव ठेवण्यात आले.
हेही वाचा : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, कोकण व मध्य महाराष्ट्रावर परिणाम
नुकतेच या पालीवरील संशोधन ‘एशियन जर्नल ऑफ कंजर्वेशन बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकेत प्रसिद्ध झाले.‘निमास्पिस रशिदी’ ही पाल त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या रंग छटांमुळे दिसायला अतिशय सुंदर दिसते. या संशोधनामध्ये अमित सैय्यद, सॅमसन किरूबाकरण, राहुल खोत, थानीगैवल ए, सतीशकुमार, आयान सय्यद, मासूम सय्यद, जयदीत्या पूरकायास्ता, शुभंकर देशपांडे आणि शवरी सुलाखे हे सहभागी होते.