नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचून एका युवकाच्या कारचे नुकसान झाले. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी कारमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या पुलाची बांधकाम करण्याची जबाबदारी असलेल्या ‘एनएचएआय ‘ अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे.

कार मालक विशेष श्रीवास्तव हे शुक्रवारी कार घेऊन पारडी पुलाखालून जात होते. यादरम्यान पारडी उड्डाणपुलाचा प्लास्टरचा एक तुकडा श्रीवास्तव यांच्या कारवर पडला. यामध्ये कारचे जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे विशेष श्रीवास्तव यांनी कारचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वाठोडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी लेखी तक्रारीवरून घटनेस जबाबदार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच एनएचएआय च्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून संबंधित जबाबदार व्यक्ती बाबत विचारणा केली आहे. गुन्हा दाखल होताच एकच खळबळ उडाली असून आता पोलीस कारमालक विशेष श्रीवास्तव यांच्या लेखी तक्रारीवरून दाखल गुन्ह्याचा तपास करत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पारडी उड्डाणपूल  गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले होते. गुरुवारी सकाळी या पुलाचे प्लास्टर खचल्याची बाब समोर आली. कामठी मार्गावरील एका निर्माणाधीन पुलाचा भाग काही दिवसांपूर्वी खचला होता. शहरात सर्वत्र उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. पण, त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून होत आहे. या पुलाचे  ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील बुटीबोरी उड्डाणपूलही दीड महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे खचला होता. त्या पुलाची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भूमिपूजनाला सुमारे साडेनऊ वर्षे झालीत. बांधकाम सुरू होऊन साडेसात वर्षे पूर्ण झालीत. पारडी उड्डाणपुलाचे पूर्ण करण्याची अंतिम मुदत एनएचएआयने वारंवार पुढे ढकलली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु एचबी टाऊन, सेंट्रल एव्हेन्यूकडील मार्गिका आणि अंतर्गंत रिंग रोडकडील मार्गिकेचे काम अपूर्ण होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू होते. अखेर ते काम पूर्ण झाले आणि ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. परंतु, या पुलाचे प्लास्टर खचल्याने खळबळ उडाली.