यवतमाळ : पुण्यात नोकरीच्या शोधात निघालेल्या बाभूळगाव तालुक्यातील गोंधळी वाटखेड येथील निखिल पाथे या तरुणाचा रोजगाराचा शोध अर्ध्यातच थांबला. शुक्रवारी सिंदखेडराजा नजीक झालेल्या भीषण अपघातात निखिलचा होरपळून मृत्यू झाला. ही बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली.

निखिल पाथे हा बाभूळगाव तालुक्याच्या गोंधळी गावातील रहिवासी होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे त्याने नोकरीच्या शोधात पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यात नोकरी मिळाल्यानंतर दरमहा किमान पाच हजार रुपये घरी पाठवेन, असे सांगून तो शुक्रवारी सायंकाळी यवतमाळ येथून विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाला होता. निखिलचा भाऊ हर्षद पाथे याने त्याला यवतमाळ येथे ट्रव्हल्समध्ये बसवून दिले होते. सकाळी निखिल पुण्याला पोहोचल्याचा फोन येण्यापूर्वीच विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघाताची माहिती पाथे कुटुंबियांना दूरचित्रवाहिन्यांवरून समजली. त्यानंतर आज प्रशासनानेही गोंधळी येथे त्याच्या घरी जावून ही माहिती दिली.

हेही वाचा – Buldhana Accident : करुणांत! थिबकलेले अश्रू अन् अंत्यसंस्काराची असह्य प्रतीक्षा, आप्त स्मशानभूमीत…

यासंदर्भात बोलताना निखिलचा भाऊ हर्षद म्हणला, तो नोकरीसाठी पुण्याला निघाला होता. आम्ही त्याला बसमध्ये बसवून दिले. त्याचे ग्रॅज्युएशन झाले होते. त्याला बसमध्ये बसताना पैसे हवे होते, पण तेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हते. म्हणून मी त्याला तू पुण्याला पोहोचला की, सकाळी तुला पैसे पाठवतो, असे सांगितले. आज सकाळी निखिलला पैसे पाठवण्यासाठी फोन केला. त्यावेळीच बुलढाण्यातील अपघातात विदर्भ ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाल्याची बातमी झळकली आणि आमच्या काळजात धस्स झाले. निखिल वाचला असेल, ही आशा अखेरपर्यंत होती. मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाल्याचे समजले आणि आम्ही उन्मळून पडलो, असे हर्षद म्हणाला. निखिलच्या अपघाती मृत्यूने गोंधळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.