नागपूर: राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली. बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याच्या आरोपाखाली वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे याला एप्रिल महिन्यात निलंबित करण्यात आले होते. परंतु, चौकशी अहवालात वाघमारे दोषी आढळल्यानंतर तो फरार होता. अखेर चार महिन्यांनंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. २०१९ ते २०२५ पर्यंत या माध्यमातून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. या प्रकरणात नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले. या संपूर्ण घोटाळ्याचे लोण राज्यभर पसरले आहे. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती.

प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे तसेच, शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता, बनावट शालार्थ आयडी प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्यांना वेतन अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये नीलेश वाघमारे दोषी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे शासनाने वाघमारे यांना पुढील कारवाई होईपर्यंत निलंबित केले होते. यानंतर या प्रकरणात अनेक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, वाघमारेला आतापर्यंत अटक होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला जात होता. मात्र, अखेर पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली.

वाघमारेचे गोव्यामध्ये दोन ‘रिसॉर्ट’

निलेश वाघमारे यांनी वेतन अधीक्षक असताना मोठी आर्थिक माया जमावल्याची माहिती आहे. याशिवाय गोव्यामध्ये वाघमारे यांनी दोन ‘रिसॉर्ट’ बांधले आहे. त्यामुळे तो येथेही लपून बसला असल्याचा संशय पोलिसांना होता. यासोबतच भूखंड विक्रेता म्हणूनही तो व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. याशिवाय त्याने बरीच माया जमवली आहे.