वर्धा : निसर्ग सेवा समिती ही संस्था निसर्ग संगोपणात अनेक वर्ष कार्यरत आहे. त्यासाठी या संस्थेस केंद्र व राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज या संस्थेचा परिसर हा हजारो लोकांसाठी सावली देत आहे. याच संस्थेद्वारा निर्मित ऑक्सिजन पार्क परिसराच्या निर्मितीस २५वर्ष पूर्ण होत आहे. रजत जयंती वर्षानिमित्ताने यावर्षी एक आगळे वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ते म्हणजे पाऊले फुलांचे.. पुष्पोत्सव.. बुच वृक्षोत्सव. अश्या आगळ्यावेगळ्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नुकताच कार्तिक महिन्यास सुरुवात झाली असून थंडीची चाहूल लागत आहे. त्यासोबतच अनेक वृक्षांची पानगळ पण आपण बघतो. अकस्मात हे सर्व घडत आहेत ते आपण सहजच म्हणतो. परंतु सोबतच ग्लोबल वार्मिंगची चाहूल आहे आणि त्याला आपणच सर्व जबाबदार आहोत. या काळात सुंदर वृक्षांचे निरीक्षण अत्यंत आवडीने अनेक लोक करतात. वनात,गावात आणि उद्यानात अनेक वृक्षांच्या फुलांच्या दर्शनाचा योग येतो.निस्पर्श सुखाच्या गोड क्षणाच्या स्मृती ते देऊन जातात. वृक्षांना फुलोरा येणे हे जीवन रहस्याची एक सहज अभिव्यक्ती होय.वृक्षाच्या सौंदर्याचे निरूपण आणि चिंतन करीत असताना मनुष्याच्या अंतरात्मा निसर्गाच्या बहिरंगाशी एकरूप होतो, अशी भूमिका संस्थेचे मुरलीधर बेलखोडे मांडतात.
प्रकृती आणि पुरुषाचे मिलन म्हणजेच सुखाची पराकाष्टा. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये बूच वृक्ष जो आकाश नीम, मिनी चमेली, निम चमेली अशा अनेक नावाने प्रसिद्ध असलेल्या या वृक्षाच्या फुलांचं आज स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार प्रफुल्ल व्यास तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ आरती प्रांजळे घुसे होत्या. आकाश नीम या वृक्षास सर्व निसर्ग सेवक तसेच प्रमुख पाहुण्यांनी भेट देऊन जलसिंचन करून पाऊले फुलांचे बुच महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
आकाश नीम, बूच अशा विविध नावाने भारतामध्ये प्रसिद्ध असलेला हा वृक्ष. ज्याची फुले आपल्या मंद सुगंधाने सर्वांचे अंतकरण प्रफुल्लित करतात. मन शांत होऊन जाते. शुभ्र रुपेरी फुलांचा गोड सुहास रात्रभर दरवळतो. नोव्हेंबर डिसेंबर आणि पुन्हा एप्रिल ते मे या महिन्यात या फुलांचा मंजिऱ्या डेखाच्या टोकाला गुच्छ प्रमाणे लागतात. फुलं उमलतात आणि काही वेळात गळून पडतात. जमिनीवर फुलांचा जणू सडा पडलेला असतो. हे वृक्ष थेट ८० फुटापर्यंत उंच वाढणार.सरळ बांध्याचा. सुंदर सदापर्णी वृक्ष आहे, अशी माहिती डॉ. आरती प्रांजळे घुसे यांनी दिली. तसेच शास्त्रीय अभ्यासपूर्ण विस्तृत बुच वृक्षाविषयी माहिती दिली. प्रफुल्ल व्यास यांनी सुद्धा पर्यावरण पूरक असे अनेक विविध उपक्रम घेतल्याचे सांगितले.ज्यात वृक्ष रोप, विविध प्रजातीची बीज संकलन करून अनेकांना भेट देण्यात आले.
सोबतच तुळशी या औषधी युक्त वृक्ष रोप मोठ्या प्रमाणात वाटप करून लोकांमध्ये पर्यावरण व वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. पुढेही प्रत्येक आठवड्यामध्ये विविध वृक्षांचा महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगणारा कार्यक्रम घेण्यात आल्याचे आपल्या प्रास्तविकेतून निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले.
ऑक्सिजन पार्क परिसरात दैनिक योग करणारे तसेच निसर्ग सेवक सर्व बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. अनिलजी देवतळे निवृत्त शिक्षक यांनी बूच फूलोत्सव निमित्ताने अनुरूप अशी स्वरचित कविता प्रस्तुत केली. आखरे यांनी जय घोष घेतला. वृक्ष सुद्धा मानवाप्रमाणे विविध वळणे घेतात. फुलोरा येणे हे जणू गर्भारपण अशी प्रतिक्रिया निसर्ग प्रेमी नागरिकांनी दिली. त्याचाच हा आजचा सोहळा, असे सांगण्यात आले.
