नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा कायमच राजकीय वर्तुळात रंगत असते. मात्र, खुद्द गडकरींनी एका कार्यक्रमात यावर स्पष्टीकरण दिले आहे. गडकरीनी भाषणातून अनेकदा आपल्याच सरकारवर टीकाही केली. सत्य मांडण्यासाठी कुणालाही न घाबरणारे अशीही त्यांची ओळख आहे. नागपूरच्या आयआयएममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
गडकरी आपल्या भाषणात म्हणाले की, काम करण्याचा आणि ज्ञानाचा काहीही संबंध नाही. मी विधि महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ज्यांना खूप चांगले गुण मिळाले त्यांच वकीली व्यवसाय आज चालत नाही. तर जे शेवटच्या बाकावर बसायचे ते मोठे वकील आहेत. त्यामुळे खूप अभ्यास करून गुणवत्ता यादीत आल्याने सर्वकाही होईल असे नाही. कमी गुण मिळाले तरी चालेला मात्र, प्रात्यक्षिक ज्ञान किती मिळेल यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचेही गडकरी म्हणाले. नागपूर आयआयएममध्ये कार्यक्रम असल्याने गडकरींनी यावेळी शासकीय यंत्रणेवही टीका केली.
आयआयएम नागपूरची इमारत बांधण्यासाठी नियम डावलून खासगी कंत्राटदाराला काम दिले. दर्जेदार डिजाइन तयार करणाऱ्यांची एक स्पर्धा घेतली. त्यानंतर एकाची निवड करून काम दिले. त्यामुळे आज आयआयएमची सुंदर अशी इमारत उभी आहे. मात्र आयआयएमच्या बाजूला असलेल्या एम्समध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा पूर्ण प्रभाव सोडला आहे. मी हे म्हणू शकतो कारण मी सरकारमध्ये आहे. मी गध्याला घोडा कसा म्हणू, असा प्रश्नही गडकरींनी केला. त्यातील मोठ्या कंत्राटदाराने खूप बेकार कामे केली. त्याने माझ्याकडून खूप शिव्या खालल्या. त्याला सांगितले की, दरवाजा बंद करून खूप ठोकेन, आयुष्यभर लक्षात राहील, अशा शब्दात बजावल्याचे गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरींनी नागपूर महापालिकेमध्ये कंत्राटदार आणि काही अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या विविध कामांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मी देवाला असे मागणे मागेल की मला, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही बनवू नको. मात्र, महापालिकेमध्ये अधिकारी बनवून फटके मारणारा बनव. म्हणजे काम न करणाऱ्यांना मला फटके मारता येतील असेही गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरींनी मीहान उभारण्यासाठी कसे प्रयत्न केले हे सांगितले. प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती खूप आपश्यक आहे. कुणीही कामाची जबाबदारी घ्यायला तयार नसतात. जे काम हातात घेतले त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची गरज आहे. नागपूरमध्ये राेजगाराची कमतरता नाही. खूप मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्याने रोजगार उपलब्ध झाला आहे असेही ते म्हणाले. आयुष्यात सर्वात अधिक महत्त्व आरोग्याला द्या. प्रत्येकाच्या उणिवा आणि जमेच बाजू असतात. मात्र, त्यावर मात करूनही आरोग्य जपा. स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात. परंतु, स्वप्न दाखवून ते पूर्ण करणाऱ्या नेत्यांवर लोक प्रेम करतात, असेही गडकरींनी सांगितले.
