नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक भूमिकेसाठी देशात प्रसिद्ध आहेत. देशातील महामार्गांचा वेगवान गतीने विकास करण्याकरिता मोदी सरकारमध्ये त्यांना विशेष ओळख प्राप्त आहे. नितीन गडकरी हे मूळचे नागपूरकर असून २०१४ पासून सलग तीनदा नागपूरचे खासदार आहेत.
२०१४ साली कॉंग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा पराभर करत गडकरी खासदार झाले आणि मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय रस्ते व महामार्ग विभागाचे प्रमुख करण्यात आले. यानंतर गडकरी यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.
गडकरी यांच्या कार्यकाळात नागपूर शहराचाही वेगाने विकास झाला आहे. शहरात मेट्रोचे जाळे, सिमेंटचे रस्ते, चारही भागात विविध उड्डापूल यासह विविध विकासकामे करण्यात आली आहे. या भौतिक विकासासोबतच शहराचा सांस्कृतिक विकास करण्याकरिता त्यांनी दहा वर्षांपूर्वी खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू केले होते. दरवर्षी या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकार नागपूरमध्ये आले आणि सादरीकरण केले. यंदाही खासदार सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटात सुरू आहे.
शहरातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सव ७ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. या महोत्सवाच्या अंतर्गत रविवार, १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या सुरेल आवाजात सादर करीत नागपूरकरांना आपल्या परफॉर्मन्सने आवाजात रंगवून टाकले.
‘हाऊसफुल्ल’ गर्दीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दहावा दिवस चांगलाचा गाजला. दोन वर्षांपूर्वी श्रेया घोषाल यांची खासदार सांस्कृतिक महोत्सव कॉन्सर्ट झाली होती. नितीन गडकरी यांनी यावर्षी परत एकदा आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून देखण्या आणि लाडक्या गायिकेला ऐकण्यासाठी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणाबाहेर रांगा बघायला मिळाल्या.
वेळेपर्यंत कॉन्सर्टच्या पासेसची मागणी सुरूच होती. सायंकाळीं पाच वाजताच्या दरम्यान पूर्णपणे लोकांनी भरून गेले. तेवढ्याच संख्येने बाहेरही लोक प्रवेश करण्यासाठी ताटकळत उभे होते. आत बसायला जागाच नसल्यामुळे हजारो प्रेक्षकांना निराश व्हावे लागले. समाजमाध्यमांवर खासदार महोत्सवातील या अव्यवस्थेमुळे नागपूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी नागपूरकरांना संबोधित केले.
काय म्हणाले गडकरी?
मागील दहा वर्षांपासून नागपूरकरांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवावर भरभरून प्रेम केले आहे. नागपूरकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे नागपूरवासियांचे आभार मानतो. आज श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमालाही लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. पटांगणावर जितके लोक होते तितकेच लोक बाहेर उभे होते, याची मला जाणीव आहे. ज्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला नाही, त्यांची मी क्षमा मागतो. भविष्यात सर्वांना कार्यक्रमांचा आनंद घेता येईल, अशी व्यवस्था केली जाईल, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
