नागपूर : मी विद्वान नाही. योगायोगाने मला डॉक्टरेट मिळाली. मुळात मी त्या डॉक्टरेटच्या लायकीचाच नाही आणि म्हणूनच मी माझ्या नावासमोर डॉक्टर लावत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे विषय कोणताही असला तरी त्यावर स्पष्टपणे भाष्य करण्यास ते कधीच टाळत नाहीत. आताही त्यांनी मानद डॉक्टरेट मिळाल्यानंतर नावासमोर डॉक्टर लावून मिरवणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

महान भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री विष्णू गणेश भिडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी व्हीएनआयटीच्या मुख्य सभागृहात भिडे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत कोते. महाराष्ट्र विज्ञान अकादमी, मौतिकशास्त्र परमोशन ट्रस्ट, व्हीएनआयटी आणि भिडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केले जाणारे हे १८ वे व्याख्यान होते. भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर यांनी ‘विज्ञान आणि ज्ञानाचा शाश्वत सातत्य’ या विषयावर व्याख्यान दिले.

अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे प्रा. प्रेमलाल पटेल व प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. व्यासपीठावर व्हीएनआयटीचे माजी संचालक डॉ. प्रमोद पडोळे, व्हीएनआयटीचे भौतिकशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. व्ही. के. देशपांडे होते. विविध क्षेत्रातील नामांकिताना अनेक विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट दिली जाते. आणि मग स्वतःच्या नावासमोर ही डॉक्टरेट पदवी लावून लोक मिरवतात. पात्रता नसतांनाही मिळालेली ही मानद डॉक्टरेट पदवी नावासमोर लावण्यासाठी आपण लायक आहोत का हे सुद्धा पाहिले जात नाही.

मानद पदवी समोरच्या विद्यापीठाने दिली तरी नावासमोर ती लावायची की नाही हा सर्वस्वी निर्णय आपलाच असतो. मात्र, लोकांना ती नावासमोर लावून धन्यता मिळवायची असते. मात्र, स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी यांना ते मान्य नाही. त्यांनाही ही मानद डॉक्टरेट मिळाली आहे, पण ते स्पष्टपणे नावासमोर ती पदवी लावण्यास नकार देतात. भिडे स्मृती व्याख्यानमालेत ते स्पष्टच म्हणाले की, ती पदवी नावासमोर लावण्याची माझी पात्रताच नाही. कारण ती मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि मी तेवढा विद्वान नाही. ही मानद पदवी मिळणे हा निव्वळ योगायोग आहे. त्याचा आणि माझ्या बुद्धिमत्तेचा काहीच संबंध नाही. गडकरींसारखे ही बाब स्पष्टपणे मान्य करणारा व्यक्ती कुणीही सापडणार नाही. त्यांच्या या कानपिचक्या मानद डॉक्टरेट नावासमोर लावून मिरवणाऱ्यांना कळणार का, हाच खरा प्रश्न आहे.