अमरावती : महावितरणकडून वीज ग्राहकांकडे बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळत आहे. सरासरी वीज बिल, सदोष मीटर बिल या तक्रारी शून्य झाल्या असून ग्राहकांच्या एकूणच तक्रारींमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे, असा दावा महावितरणने केला आहे. विशेष म्हणजे वापराएवढेच अचूक वीजबिलाची नोंद करणारे स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यासाठी परिमंडळात २७२ ग्राहकांनी स्वत:हून महावितरणकडे मागणी केली आहे.
टीओडी मीटर हे वीज नियामक आयोगाद्वारे प्रमाणित आणि पूर्णतः अचूक असलेले मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. प्रोग्राम आधारित असल्याने मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नाही, शिवाय दिवसा वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रूपया सवलतीसाठी टीओडी मीटर आवश्यक आहे. महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही.
अमरावती परिमंडळात आतापर्यंत १ लाख ४३ हजार २७२ ठिकाणी टीओडी मीटर बसविण्यात आले आहे, यामध्ये अमरावती जिल्ह्यात ९५ हजार ३२३ आणि यवतमाळ जिल्ह्यात ४७ हजार ९४९ टिवोडी मीटर बसविण्यात आले आहेत. वीज ग्राहकांसोबतच, शासकीय कार्यालये, महावितरण कर्मचारी या ग्राहकांचा यात समावेश असून या ग्राहकांकडून टीओडी मीटर बाबत एकही तक्रार या कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणचे टीओडी मीटर अत्याधूनिक तंत्रज्ञावर आधारीत असल्याने अचूक असून वीज ग्राहकांच्या फायद्याचे आहे. तरी, वीज ग्राहकांच्या स्मार्ट टीओडी मीटर बाबत शंका, प्रश्न, तक्रारी असल्यास संबंधित क्यूआर कोड स्कॅन करण्याचे किंवा तक्रार नोंदविण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणला येणाऱ्या आणि महावितरणकडून वितरीत होत असलेल्या विजेच्या अचूक बिलिंगसाठी उपकेंद्र, फिडर व डिटीसी, याशिवाय उच्चदाब ग्राहक, शासकीय कार्यालये, नादुरुस्त मीटर धारक, दुर्गम भागातील वा मीटर रीडिंग घेता न येणारे ग्राहक तसेच महावितरणचे कर्मचारी यांना प्राधान्याने हे स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत.
महावितरणच्या अमरावती परिमंडळात स्मार्ट टीओडी मीटर लावण्याचे कार्यादेश जीनस कंपनीला देण्यात आले असून ९७ महिन्यापर्यंत हे मीटर योग्य व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीदेखील त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या फायद्याचे असलेले टीओडी मीटर लावण्यासाठी वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.