नागपूर : शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून त्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर शहरात महापालिकेच्या हद्दीतील १५२१, नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील १७२१ आणि नागपूर महानगर विकास प्रादेशिक विकास प्राधिकरणअंतर्गत ३०१९ अशा एकूण ६२६१ अनधिकृत बांधकामांना संबंधित प्राधिकरणांनी नोटीस बजावली आहे.
अनधिकृत बांधकाम करू नये आणि चुकीच्या सल्ल्यांना बळी पडू नये, असे वारंवार आवाहन महापालिका प्रशासनासह नागपूर सुधार प्रन्यासकडून केले जाते. त्यानंतरही शहरातील अनेक भागात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महापालिकेत गेल्या आठवडय़ात शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत बैठक झाली. त्यात शहरातील विविध झोनमधील अनधिकृत बांधकामाचा आढावा घेऊन त्यांना नोटीस देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर महापालिकेने आतापर्यंत १५२१ अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामाची १५२१ मध्ये सर्वाधिक बांधकाम पश्चिम आणि त्यानंतर उत्तर नागपुरात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात व्यापारी प्रतिष्ठाने, निवासी संकुलाचा समावेश आहे. १५२१ पैकी ४० प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे. मंजूर आराखडय़ातील खुल्या जागा व अॅिमिनिटी स्पेसमधील स्वत:च्याच मिळकतींवर अनधिकृत ठरल्यानंतर या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यासंदर्भात नगररचना विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
शहरातील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे. १५२१ अनधिकृत बांधकामाची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व बांधकामांना नोटीस देण्यात आल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त महापालिका
कचरायुक्त तलाव शहराच्या सौंदर्यात तेथील तलाव भर घालतात. नागपूर तर तलावांचे शहर म्हणूनच ओळखले जाते. पण त्यांची सध्या दुर्दशा झाली आहे. सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणावर कोटय़वधी रुपये खर्च होऊनही या तलावाची सध्या अशी दुरवस्था झाली आहे. सर्वत्र कचरा टाकण्यात आला आहे.