‘आरसा’अ‍ॅपद्वारे दागिने घालण्याचा लाईव्ह आनंद अनुभवा; व्यापाऱ्यांच्या दालनातील दागिन्यांचे डिझाईन आता भ्रमणध्वनीवर

नागपूर : सोनं,चांदी, हिऱ्यांचे दागिने खरेदी महिलांसाठी स्वप्नवत असते. दागिन्यांमध्ये आवडीचे डिझाईन प्रत्येक दालनात मिळेलच याची शाश्वती कमी असते. त्यांना मनपसंतीचे दागिने खरेदीसाठी अख्खा सराफा बाजार पिंजून काढावा लागतो.  मात्र आता युवा सराफा व्यावसायिक कुणाल कावळेने लाईव्ह दागिने घालून अनुभवण्यासाठी ‘आरसा’ अ‍ॅप आणले आहे. अशाप्रकारचा हा देशातील पहिलाच अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये शहरातील नामांकित सोने व्यापाऱ्यांच्या दालनातील सर्व दागिन्यांचे डिझाईन थेट स्मार्टफोनच्या माध्यमातून अंगावर घालून ते आपल्यावर कसे दिसतात हे पाहता येणार आहेत.

आजच्या काळात ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे वाढता कल बघता शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील आता कात टाकण्यास सुरुवात केली असून व्यवसायात डिजीटल प्रणालीचा उपयोग करणे सुरू केले आहे. स्थानिक सराफा बाजारातील युवा व्यावसायिक कुणाल पुरुषोत्तम कावळेने शहरातील विविध सराफा व्यावसायिकांच्या दालनातील शेकडो डिझाईनचे दागिने ‘आरसा’ अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना बघता येणे शक्य करून दाखवले आहे. त्याशिवाय तुम्हाला आवडलेल्या दागिना हा थेट तुम्ही घातल्यावर तुमच्यावर कसा दिसतो हे देखील स्मार्टफोनच्या अ‍ॅपच्या माध्यमातून बघणे शक्य झाले आहे. यासाठी आरसा अ‍ॅपमध्ये ‘स्वाई टू ट्राय’असे ऑप्शन दिले आहे.अ‍ॅपमध्ये सध्या रोकडे ज्वलेर्स, उदापुरे ज्वेलर्स, लोंदे ज्वलेर्स,भांडाकर ज्वेलर्स अशा नामांकित दालनातील सर्व दागिन्यांचे प्रकार न्याहाळता येणार आहे. आवडलेला दागिना लाईव्ह घालून बघताही येणार आहे. शहरात मोठे सोने व्यापाऱ्यांची दालने सुरू होत असून त्यांना टक्कर देण्यासाठी ही संकल्पना स्थानिक व्यावसायिकांनी आणली आहे. अ‍ॅपमध्ये ऑगमेंटेड रिआलिटी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून ते गुगल प्लेस्टोअर्सवर उपलब्ध आहे. कोणत्याही सराफा व्यापाऱ्याने नवी डिझाईन बाजारात आणताच ते या ‘आरसा’ अ‍ॅपवर सहज बघता येणार आहे. अ‍ॅपमध्ये नेकलेस, इअर रिंग, राणी हार, मांग तिलक, चेन, मंगळसूत्रासह अनेक विविध दागिन्यांचे  विविध पर्याय असतील. तुम्ही त्यावर जाताच अनेक व्यावसायिकांच्या दालनातील दागिन्यांचे डिझाईन घरबसल्या बघता येणे शक्य आहे. शिवाय दागिन्यांच्या खाली कोणत्या विक्रेत्याचे ते दागिने आहे ही देखील माहिती अ‍ॅपवर बघता येणार आहे. त्यामुळे आता महिलांना घरबसल्या दागिन्यांचा विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. तसेच दागिने खरेदीला गेल्यावर सराफा बाजार अथवा इतर ठिकाणी वाहनातळाची समस्या आणि वाहतूक कोंडीचा सामनाही ग्राहकांना करावा लागतो. मात्र या अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या दागिने घालून पाहण्याचा अनुभव आणि पसंत आल्यास थेट जाऊन खरेदी करता येणे शक्य झाले आहे.

युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी ही संकल्पना आम्ही अ‍ॅपच्या माध्यमातून समोर आणली आहे. ज्वेलरीपासून युवा पिढी दूर जात आहे. त्यांची पहिली मागणी मोबाईल,गाडी बनली आहे. मात्र त्याची किंमत पुढे काहीच नाही. मात्र त्यांनी सोन्यात गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा आहे. तसेच दालनात जाऊन दागिने पसंत येतील याची शाश्वती नसते. त्यामुळे ‘आरसा’ अ‍ॅपद्वारे तुम्ही शहरातील नामांकित दालनातील सर्व डिझाईनचे दागिने थेट घालून कसे दिसाल याचा अनुभव या अ‍ॅपच्या माध्यमातून घेता येईल. ‘आरसा’अ‍ॅप भारतातील पहिला दागिने घालून लाईव्ह पाहता येणारा एकमेव अ‍ॅप आहे.

– कुणाल कावळे, युवा सराफा व्यावसायिक