मोठ्या प्रमाणात होणारी विकासकामे आणि लांबणारा पावसाळा कारणीभूत
नागपूर : पर्यावरणाच्या संतुलनाची दिशा दाखवणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांवर आता पर्यावरणाच्या असंतुलनामुळे स्थलांतरण थांबवण्याची वेळ आली आहे. जगभरात सुमारे ४० टक्के पक्षी हे हवामानातील बदलानुसार स्थलांतर करत असताना गेल्या काही वर्षात हे स्थलांतरण धोक्यात आले आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असणाऱ्या पाणस्थळ जागांवर होणाऱ्या विकासाच्या अतिक्रमणासोबतच उशिरा सुरू होऊन लांबणारा पावसाळा देखील कारणीभूत ठरत आहे.




ध्रुवीय प्रदेशातील दिवस लहान असल्यामुळे पक्ष्यांना हिवाळ्यात अन्न शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित प्रदेशाकडे स्थलांतर करतात. वातावरणीय बदल आणि अन्नाची उणीव या मुख्य कारणांमुळे हे स्थलांतर असते. ध्रुवीय प्रदेशाच्या तुलनेत भारतात थंडी कमी असल्याने हजारो किलोमीटरचे स्थलांतरण करून पक्षी इकडे येतात आणि काही काळानंतर परत जातात. भारतातील अन्य प्रदेशांप्रमाणे जंगल, गवताळ प्रदेश, किनारपट्टी, समुद्र, मिठागरे, धरणे, नद्या, खाडी, भात खाचरे, ओहोटीचे प्रदेश, उथळ दलदलीच्या जागा अशा अनेकविध अधिवासांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातदेखील अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. बहुतेक पक्षी स्थलांतरासाठी प्रजनन-स्थानाशी जवळीक साधणारे भौगोलिक स्थान, हवामान आणि पर्जन्यमान यावर आधारित भूप्रदेशाची निवड करतात. मात्र, या पक्ष्यांचे देशांतर्गत आणि विदेशात होणारे स्थलांतरण आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. महाराष्ट्रात सुमारे १७ हजाराहून अधिक परिसंस्था असून सुमारे ६४ पेक्षा अधिक प्रजातीचे पक्षी येतात. त्यामुळे या परिसंस्थांच्या संवर्धनाचे आव्हान सरकारसमोर आहे. गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने येणारे हे पक्षी आता शेकडोच्या संख्येतही उरले नाहीत. विदर्भात तलावांची संख्या मोठी आहे. तरीही लहान, पक्षी, रानपक्षी, पानपक्ष्यांची संख्याच आता रोडावली आहे. स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासावर शासकीय यंत्रणांनी बांधकाम किंवा विकासात्मक कामे करताना त्या अधिवासाला धोका पोहोचवू नये. मात्र, अमरावती जिल्ह्यातील छत्री तलाव, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध तलाव यासारख्या अनेक तलावांवर चौपाटी उभारुन पक्ष्यांच्या अधिवासालाच धोका पोहोचवला गेला आहे. त्याचवेळी गेल्या तीन-चार वर्षांपासून लांबणारा पावसाळा देखील पक्ष्यांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी तेवढाच कारणीभूत ठरला आहे.
पक्षी सप्ताहाची सुरुवात
गेल्या वर्षापासून राज्यशासनाने संपूर्ण राज्यात पक्षीसप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली. स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाचा काळ आणि सप्ताह एकाचवेळी असल्याने पक्ष्यांच्या अधिकाधिक नोंदी होतील. नेमके कोणत्या पक्ष्यांचे आगमन थांबले आहे, त्यांच्या परत येण्यासाठी आणि मुक्काम वाढण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, हे या पक्षीसप्ताहातून कळणार आहे.