सतरंजीपुरातील वडील करोनाग्रस्त असल्याचे काही दिवसांपूर्वी निदान झाले असतानाच  त्यांचा आमदार निवासात विलगीकरणात असलेला २३ वर्षीय मुलगाही करोनाग्रस्त असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. दरम्यान शहरात या रुग्णासह इतर एक असे दोन रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या १३८ वर पोहचली आहे. करोनाग्रस्त २३ वर्षीय मुलगा पूर्वी लोणारा येथील केंद्रात विलगीकरणात होता. येथून त्याला आमदार निवासात नुकतेच हलवले  होते. त्याचा  अहवाल सकारात्मक आल्यावर मेडिकलला हलवण्यात आले.  सतरंजीपुराशी संबंध असलेला व सिंबॉसीस येथे विलगीकरणात असलेल्या आणखी एका ५५ वर्षीय व्यक्तीलाही या विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यालाही रुग्णालयात हलवण्यात आले. यापैकी पहिल्या रुग्णाचा पहिल्यांदा घेतलेला अहवाल नकारात्मक असला तरी काही दिवसांनी दुसऱ्यांदा घेतलेला अहवाल सकारात्मक आढळला. दरम्यान शहरातील सगळ्याच विलगीकरण केंद्रात मोठय़ा प्रमाणावर नागरिकांना ठेवण्यात आल्याने आता त्यांचे नमुने घेण्याचा ताण मेडिकल, मेयो आणि एम्सच्या चमूवर वाढला आहे. दुसरीकडे आताही मेयो वगळता इतर प्रयोगशाळेत २२, २५, २७ आणि इतर दिवसांत पाठवलेले नमुन्यांचा अहवाल तेथील प्रयोगशाळेकडून  संबंधित विलगीकरण केंद्रांना मिळत नसल्याने तेथील नागरिक कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करत आहेत.

‘कम्युनिटी बाजार’ सुरू

माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून आठ रस्ता चौकातील लक्ष्मीनगर मैदानात शहरातील पहिले ‘कम्युनिटी बाजार’ साकारण्यात आले आहे. आज गुरूवारी याचा शुभारंभ झाला.दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महापालिकेच्या सहकार्याने ही संकल्पना राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, याा बाजारात सामाजिक अंतर ठेवत पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. या बाजाराला प्रतिसाद मिळाला तर शहरात इतर ठिकाणीही याच धर्तीवर बाजार सुरु करणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

नमुने ठेवण्याच्या नळीचा तुटवडा!

भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनेनुसार संशयित व्यक्तीच्या नाकातून आणि तोंडातून असे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे द्रव्याचे नमुने घेऊन ते नळीत ठेवले जातात. परंतु सध्या या नळ्यांचा तुटवडा असल्याने एकाच ठिकाणचे नमुने घेतले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे

बाळाला अतिदक्षता विभागात हलवले

मेयोत बुधवारी प्रसूती झालेल्या करोनाबाधित महिलेला स्वतंत्र खोलीत तर तिच्या बाळाला एनआरसीयूत हलवले आहे. दोघांवरही येथील तज्ज्ञ डॉक्टर  लक्ष ठेवून आहेत. या बाळाचीही लवकरच तपासणी होणार आहे.

..तर मोमीनपुरावासीयांचेही विलगीकरण

गेल्या काही दिवसात १० रुग्ण मोमीनपुरा परिसरात आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मोमीनपुरा भागातील बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास सतरंजीपुराच्या धर्तीवर मोमीनपुरा भागातील लोकांचे विलगीकरण करण्यात येऊ शकते, असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहे.  मृत व्यक्ती विलगीकरणातील असली तरी  येत्या दिवसात मोमीनपुरातून बाधितांची संख्या वाढू नये यासाठी जनजागृती केली जात आहे. सतरंजीपुराच्या धर्तीवर मोमीनपुरा परिसरातील लोकांचे विलगीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महापालिकेचे सहायक आयुक्त अमोल चोरपगार यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी तसे संकेत दिले.

मध्यवर्ती कारागृहातही संचारबंदी

कारागृहात करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करोनाबाधित क्षेत्रातील सात कारागृहांमध्येही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहही तातडीने बंद करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक कारागृहात संचारबंदी यापूर्वीच लागू करण्यात आली होती. आता उपराजधानीचा समावेश ‘रेड झोन’मध्ये करण्यात आला असून नागपूर मध्यवर्ती कारागृहातही संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी संचारबंदी लागू झालेल्या कारागृहातील कार्यपद्धतीनुसार नागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन पाळीत करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतमध्येच करण्यात करण्यात यावी. मुख्य प्रवेशद्वार संचारबंदीमध्ये पूर्णत: बंद राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आहेत.

विलगीकरण केंद्राबाबत तक्रारी

सतरंजीपुरातील लोकांचे बुधवारी विलगीकरण करून त्यांना व्हीआरसी कॉलेजच्या वसतिगृहात ठेवल्यानंतर प्रशासनाकडून सोयी सुविधा मिळत नसल्याच्या या लोकांच्या तक्रारी आहे. एका इमारतीत ५० लोक राहत असून तेथे केवळ चार स्वच्छतागृह आहेत. अन्य वसतिगृहात स्वच्छतागृह बंद आहे त्यामुळे तेथील लोक एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांची अडचण झाल्याची तक्रार रशीद खान घोडेवाला यांनी केली.