नागपूर : ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमीदेखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे ओबीसी आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर या नेत्यांनी जवाहर विद्यार्थी वसतिगृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे भारतीय जनता पक्षाची बैठक बोलावली. यात ओबीसी समाजाचा मोर्चा सोमवारला दुपारी १२ वाजता, संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. मोर्च्यात ओबीसी समाज मोठया संख्येने सहभागी होत आहे, असे सांगण्यात आले.
या बैठकीला भाजपा नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार समीर मेघे, माजी आमदार परिणय फुके, माजी आमदार आशिष देशमुख, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, अरविंद गजभिये, संजय गाते, रमेश चोपडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, अजय बोढारे, संध्याताई गोतमारे, परिनिता फुके, नरेश बरडे, राजेश ठाकरे, रामभाऊ दिवटेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – नागपूरसह पाच शहरांत सीबीआयचे छापे, ७ जणांना अटक; प्रकरण काय? वाचा…
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिल्यावरही मोर्चात सहभागी होण्यासाठी भाजपाच्या ओबीसी नेत्यांनी बैठक बोलावली आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आहवान केले. यावरून पक्षाच्या ओबीसी नेत्यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.