चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने रा. स्व. संघ चंद्रपूर नगरच्यावतीने रविवार, ५ ऑक्टोबरला आयोजित उत्सवाला ओबीसी नेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ पुरुषोत्तम सातपुते प्रमुख अतिथी आहेत. राज्यात मराठ्यांच्या कुणबीकरणाला सकल ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. १० ऑक्टोबरला नागपुरात सकल ओबीसींचा मोर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. सातपुते यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा मतप्रवाह कुणबी समाजात आहे. समाजातील काही नेत्यांनी ॲड. सातपुते यांची भेट घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

रा.स्व. संघ, अमरावती महानगरच्या उत्सवाला माजी राज्यपाल रा.सू. गवई यांच्या पत्नी तथा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई जाणार की नाही, यावरून मोठी चर्चा सुरू आहे. त्यात आता चंद्रपूर शहरातील कार्यक्रमाचीही भर पडली आहे. ॲड. सातपुते कुणबी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. ते ओबीसी व कुणबी समाजाचे नेतृत्व करतात. मराठ्यांच्या कुणबीकरणाला ॲड. सातपुते यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

सकल ओबीसी समाजाच्यावतीने नागपुरात १० ऑक्टोबरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनाची तयारी ॲड. सातपुते करीत आहेत. राज्यात ओबीसी समाजावर अन्याय होत असताना ॲड. सातपुते यांनी संघाच्या शताब्दी उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावू नये, असा एक मतप्रवाह आहे. कुणबी समाज मंडळाचे काही सक्रिय पदाधिकारी व नेत्यांनी सातपुते यांची भेट घेतली. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवू नये, अशी विनंती केली. केवळ विनंतीच नाही, तर ॲड. सातपुते यांच्यावर कुणबी समाज मंडळातून दबावदेखील आणला जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.