नागपूर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू होते. त्याविरोधात मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमधून सरकारने आरक्षण देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ३० ऑगस्टपासून नागपूरच्या संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या उपस्थितीत सुरू होते. या आंदोलनात एक तीन महिन्यांची चिमुकली रमाई ठरली लक्षवेधी ठरली. आईच्या मांडीत बसून, डोक्यावर पिवळ्या रंगाची मोठ्ठाली टोपी घातलेली तीन महिन्यांची रमाई लक्ष वेधून घेत होती.
गुरुवारी मंत्री अतुल सावे सोबत आमदार परिणय फुके, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार विकास महात्मे यांच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेटी दिली. अतुल सावे यांनी बारा मागण्यांचा मंजुरीचा ठराव राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपोषण स्थळी वाचून दाखवल्यावर उपोषणाची सांगता करण्यात आली. मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
गुणवंत मुलांमुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ७५ विद्यार्थ्यांची संख्या वाढवून २०० विद्यार्थी करण्यात यावी. महाज्योती संस्थेकरिता एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, महाज्योतीची कामे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधान्य देण्यात यावे, म्हाडा व सिडकोतर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकूल योजनेत ओबीसी संवर्गाकरिता आरक्षण लागू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू होते. यातील १२ मागण्या मान्य करण्यात आल्या.
तर ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी, या दोन मागण्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीकरिता प्रस्तावित केल्या आहे. साखळी उपोषणाला अशोक जीवतोडे, प्रा. शेषराव येलेकर, शरद वानखडे, परमेश्वर राऊत, नाना झोडे, विनोद इंगोले, हरिभाऊ बनाईत, श्रीकांत मसमारे, रितेश कडव, निलेश कोडे आदींची उपस्थिती होती.
काय म्हणाली आई
आंदोलनस्थळी चिमुकलीची उपस्थिती पाहून कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला. लहानग्या रमाईला हातात घेऊन आई रुतिका मासमारेंनी आपले मत मांडले. “आमच्या पुढच्या पिढ्यांसाठीच हा लढा सुरू आहे. या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.” असे रुतिका मासमारे म्हणाल्या. आमच्या पिढीचा विचार करायचा असेल तर आपले आरक्षण वाचवणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.