अकोला: सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे पाचही ग्रह डोळ्यांनी सहजपणे पाहता येत आहे. सद्यस्थितीत हे सर्व ग्रह संध्याकाळी एकाच वेळी बघता येत आहेत. ८ डिसेंबर रोजी लालसर रंगाचा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने हा ग्रह अप्रतिम दिसणार आहे. हा अनोखा दुग्धशर्करा योग खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून त्याचा अनुभव अवश्य घ्यावा, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.

सूर्यास्तानंतर लगेच प्रकाश कमी होत असताना आकाशात एकेक तारा विराजमान होत असतो. यात बहुतांशी चांदण्या कमी अधिक प्रमाणात चमकणाऱ्या ताऱ्यांच्या तर अगदी मोजक्या प्रमाणात आपल्या सूर्याच्या प्रकाशाने चमकणारे पाच ग्रह पृथ्वीवरून स्पष्टपणे पाहता येतात. सायंकाळी पूर्व-दक्षिण आकाश मध्यावर सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह मीन राशीत ठळक स्वरूपात पाहता येईल.

हेही वाचा: पंतप्रधानांच्या हस्ते फक्त समृद्धीचं नव्हे तर……

याच ग्रहाच्या पश्चिमेस मकर राशीसमुहात सर्वात सुंदर वलयांकित असणारा शनी ग्रह, पश्चिम क्षितिजावर आकाराने सर्वात लहान असलेला बुध ग्रह आणि जवळच सर्वात तेजस्वी ग्रह शूक्र धनु राशीत बघता येईल.अंतर्ग्रहाची ही जोडगोळी जवळ फार कमी वेळ पाहता येईल, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.

हेही वाचा: मतदार नोंदणीसाठी वय कमी पडते?; चिंता नको, काय आहे भावी मतदारांसाठी योजना ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काहीसा अंधार वाढताना पूर्व क्षितिजावर लालसर रंगाचा मंगळ ग्रह वृषभ राशीतील तेजस्वी दिसणाऱ्या रोहिणी नक्षत्राच्या चांदणी जवळ आपले लक्ष वेधून घेईल. ८ डिसेंबरला सूर्य, पृथ्वी आणि मंगळ प्रतियुतीत असल्याने पृथ्वीवरून मंगळ ग्रह अतिशय सुंदर आणि रात्रभर पाहता येईल. पाच ग्रहांच्या एकत्रित दर्शनाची दुर्मीळ संधी प्रत्येकालाच एक अनोखी आकाशभेट राहील, अशी माहिती विश्वभारती विज्ञान केंद्राद्वारे देण्यात आली.