नागपूर : बहीण – भावाच्या पवित्र नात्याची परंपरा म्हणजे रक्षा बंधनाचा सण. पण कर्तव्याप्रती एकनिष्ठ असलेले भारतीय सैन्य दलातील लाखो जवान सीमेवर तैनात असल्याने रक्षाबंधनासाठी येऊ शकत नाहीत. पण तरीही त्यांच्यापर्यंत हा रेशीमधागा पोहचावा यासाठी करण्यात आलेल्या तीन लाख राखींचा संच शनिवारी कामठी कँटॉनमेंट झोनच्या विंगकमांडर कर्नल लवलीना यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्रहार जागृती समाज संस्थेच्या सचिव आणि सैन्य दलातून निवृत्त फ्लाईट लफ्टनंट शिवाली देशपांडे यांच्याहस्ते या राख्या सोपवण्यात आल्या.
भारतीय सैन्य दलातील लाखो जवान कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतात. मात्र सीमेवर तैनात असल्याने रक्षाबंधनाच्या पर्वावर ते बहिणीच्या हातून मनगटावर राखी बांधण्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रहार समाज जागृती संस्था दरवर्षी हा उपक्रम राबविते. त्यासाठी विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी आवाहन केले जाते. हा फक्त रेशीम धागा नसून जवानां विषयी असलेल्या बंधूप्रेमाचे प्रतीक असल्याने संस्थेच्या पुढाकारातून जमा झालेल्या तीन लाख राखींचा विक्रम या निमित्ताने करण्यात आला. संस्थेने दिलेल्या या हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण विदर्भातील तब्बल ३८ शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधील बहिणींनी स्वतःच्या हाताने ३ लाख राखी तयार केल्या. या सगळ्या राख्या देशाच्या विविध भागात सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांना पाठवल्या जाणार आहेत.
पुढील वर्षी ४ लाख राखींचा संकल्प
तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी प्रहार मिलिट्री स्कूलचे संस्थापक दिवंगत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुनिल देशपांडे यांच्या संकल्पनेतून संस्थेतर्फे १९९४ पासून हा उपक्रम राबविला जातो. गेल्या वर्षी याच उपक्रमातून २ लाख ५० हजार राख्या तर यंदा ३ लाख राखी तयार करण्यात आल्या. त्या आता रक्षा बंधनाच्या पर्वावर सीमेवर तैनात जवानांच्या मनगटावर बांधल्या जाणणार आहेत. सलग दोन वर्षे झालेल्या या विक्रमानंतर आता संस्थेने पुढील वर्षी ४ लाख राख्यांचा संकल्प केला आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठा ही भारतीय सैन्य दलासाठी सर्वोच्च स्थानी असते. कुठच्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही, ही उर्जा जवानांच्या रक्तात असते. भारतीय सैन्य दलातील जवान कोणत्याही परिस्थितीत तत्पर असतो. अशा जवानांविषयी नागपूरने नवा पायंडा निर्माण केलेले हे रक्षा सूत्र निश्चितपणे त्यांच्यासाठी सुखद क्षण ठरणार आहे.कर्नल लवलीना, विंग कमांडर, ए.पी.एस. कामठी.
देशाच्या सीमांवर तैनात लाखो जवानांमुळेच आपण कुटुंबासोबत सुखा समाधानाने सण, समारंभ. उत्सव, सोहोळे साजरे करू शकतो. उन, वारा, पाऊस असो की हाडे गोठविणारी थंडी. अगदी कशाचीही पर्वा न करता सीमेवरील जवान प्रसंगी प्राणाचीही आहुती देण्यास तत्पर असतो. राष्ट्राच्या संरक्षणापलिकडे या जवानांना काहीही मोठे नसते. अशा वेळी त्यांना एकाकी वाटू नये, म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यापुढेही तो तसाच राहील. शिवाली देशपांडे, फ्लाईट लेफ्टनंट(निवृत्त)