अकोला : रामनवमीनिमित्त भक्तिमय वातावरणात शहर भगवामय झाले आहे. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून गत ३८ वर्षांपासून भव्य शोभायात्रेची परंपरा जोपासली जात आहे. राजराजेश्वर मंदिरातून आज दुपारी ४ वाजता निघणाऱ्या शोभायात्रेत ६० धार्मिक देखावे सहभागी होणार आहेत.

रामनवमीच्या पर्वावर शहरातील मोठे राम मंदिर, छोटे राम मंदिर, बिर्ला राम मंदिरासह विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. चौकाचौकात भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेवतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव साजरा केला जात आहे. शहरातून गेल्या ३८ वर्षांपासून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. विहिंपच्या संकल्पनेतून दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रेरणेतून रामनवमी शोभायात्रा काढण्याची परंपरा सुरू झाली. शहराचा आता हा प्रमुख महोत्सव झाला. मध्य भारतातील सर्वांत मोठी शोभायात्रा म्हणून त्याचा नावलौकिक आहे. ५०० वर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यात आल्याने रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा…‘साऊथ मे भाजप साफ, नॉर्थ मे भाजप हाफ’, खासदार इमरान प्रतापगडी म्हणतात…

श्रीरामनवमी शोभायात्रा परंपरेनुसार आज दुपारी ४ वाजता श्री राजराजेश्वर मंदिरातून निघणार असून प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. शोभायात्रेत धर्मध्वजासह ११ घोडेस्वार राहणार असून बालशिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, ताराबाई आणि इतर घोड्यांवर देखावे राहतील. श्रीराम पादूकासह ५० महिला दिंडी, १० पुरुष वारकरी दिंडी, ढोलपथक आदींचा शोभायात्रेत समावेश राहील. सर्व देखावे धार्मिक स्वरुपाचे राहणार आहेत. शहर तसेच पंचक्रोशीतून देखावे सहभागी होतील. श्रीराम जन्मभूमी शोभायात्रेमध्ये जनसागर उसळणार असल्याचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा, समिती अध्यक्ष शैलेश खरोटे, समिती कोषाध्यक्ष राहुल राठी, विहिंप महानगर अध्यक्ष प्रकाश लोढीया, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, गणेश काळकर, ब्रिजमोहन चितलांगे, रामप्रकाश मिश्रा आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा…“निवडून येण्याची गॅरंटी नाही, मग जनतेला कसली गॅरंटी देताहेत,’’ संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले…

चलचित्राचे आकर्षण

यंदा महानगरात शोभायात्रा समितीद्वारे शहर कोतवाली चौक येथे २५ फूट भव्य महापराक्रमी हनुमान चलचित्र देखावा उभारण्यात आला आहे. कपडा बाजार चौक येथे गणपती मुशक परिक्रमा देखावा साकारण्यात आला. या देखाव्यांचे प्रमुख आकर्षण असून भाविकांची बघण्यासाठी गर्दी होत आहे.