इंडियन प्रिमियर लिगमधील सामन्यांवरील सट्टा प्रकरणी एका आरोपीस विशेष पथकाने गोवा येथून अटक केली. अनेक सट्टेबाज पोलिसांच्या नजरेत असून लवकरच त्यांनाही अटक होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.राजू ठाकूरदास बागडी (४३) रा. नालंदा कॉलनी, साईनगर, अमरावती असे अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजाचे नाव आहे. त्याच्याकडून ३ अँड्रॉईड व २ साधे मोबाइल असा एकूण ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने १० एप्रिल रोजी रात्री नवाथे चौक परिसरातून विनोदकुमार लक्ष्मीनारायणजी चांडक (४४) व तुषार मनोज चांडक (२९) दोघेही रा. स्वस्तिकनगर, अमरावती या दोन सट्टेबाजांना अटक केली होती. हे सट्टेबाज तेथे बनावट सॉफ्टवेअर व ॲपद्वारे खायवाडी व लागवडी करताना आढळून आले होते. या गुन्ह्यातील आरोपी राजू बागडी हा गोवा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला गोवा येथून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विशेष पथकाने मंगळवार, १८ एप्रिल रोजी फ्रेजरपुरा ठाण्यातील एका गुन्ह्यात सट्टेबाज आयुष नरेंद्र शर्मा (२६) रा. पुष्पक कॉलनी व करण राजेश गुप्ता (२६) रा. मसानगंज या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून पथकाने १५ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात १२ लाखांची कार, २ लाख ५२ हजारांचे मोबाइल, रोख व अन्य साहित्याचा समावेश आहे.
हेही वाचा >>>वर्धा: दारूची लत सुटण्यासाठी घेतली जडीबुटी, थोड्याच वेळात…
क्रिकेट सामन्यांवरील सट्ट्यावर सातत्याने कारवाई सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात पाच गुन्हे दाखल झाले असून अनेक सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. अनेक सट्टेबाज व बुकी पोलिसांच्या नजरेत असून पोलिसांची विविध पथके त्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे लवकरच त्यांनाही अटक होईल. अटक आरोपींचा मोबाइल सीडीआर व बँक डिटेल्स तपासली जाणार असून त्या आरोपी व त्यांच्या व्यवहाराचा मनी लाँड्रिंगशी संबंध आढळून आल्यास संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात येईल, असे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले.