सणासुदीच्या काळातही भाव वधारलेलेच

गेल्यावर्षी कांद्याची झालेली कमी आवक, त्यामुळे नव्या कांद्याला बाजारात येण्यास झालेला विलंब आणि यंदा पाऊस उशिरा आल्याने कांद्याचे पीक पाण्याखाली गेल्याने उत्पादनात घट झाली असून यंदा दिवाळीपर्यंत नागपूरकरांना कांदा रडवणार असल्याचे चिन्ह आहे.

दररोजच्या आहारत सर्वात महत्त्वाचा असलेला कांदा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चच्रेत राहतो. मात्र यंदा कांदा शंभरी गाठण्याच्या वाटेवर आहे. सध्या कांदा पन्नास ते साठ रुपये किलो किरकोळ बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. त्याचा दर दररोज वधारत जात आहे. त्याचे प्रमुख कारण गेल्यावर्षी कमी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे वर्षांच्या शेवटी कांदा कमी उरला आणि नवा कांदा बाजारात वेळेत न आल्याने जुन्या कांद्याची भाववाढ झाली. पावसाला उशीर झाल्याने नवा कांदादेखील बाजारात उशिरा आला. अशात कांद्याची मागणी वाढली आणि आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांनी जुन्या कांद्याची मोठय़ा प्रमाणात साठवणूक सुरू केली. त्यामुळे देखील कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. नागपुरात आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून नवा कांदा येतो. दररोज वीस ट्रक कांद्याची आवक कळमना बाजारपेठेत होते. मात्र आंध्रप्रदेशात आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक पाण्याखाली गेल्याने बाजारात नव्या कांद्याची आवक घटली आहे. शिवाय विदेशातून भारतीय कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचा भाव वधारला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कांदा नागपूरकरांना चांगलाच रडवणार आहे. किरकोळ बाजारात कांदा पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मात्र पुढील काही दिवसांत याचे भाव अधिक वाढणार असल्याचे व्यापारी सांगतात. शहरात दहा ते पंधार कांद्याचे ठोक विक्रेते असून जवळपास शंभर व्यापारी आहेत. थेट शेतकऱ्यांकडून कांदा विकत घेण्याचे प्रमाण कमी असल्याने नागपूरकरांची गरज परराज्यातून येणाऱ्या कांद्यावर भागवण्यात येते. सणासुदीत कांद्याची मागणी अधिक असते. ऐन सणासुदीच्या दिवसात कांद्याचे भाव शंभरी पार करण्याची दाट शक्यता आहे.

साठय़ावर मर्यादेचा परिणाम नाही

सध्या सरकारने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. मात्र आपल्याकडे कांदा साठवणूक होत नाही. कांदा फार तर चार पाच दिवस आपण साठवूून ठेवू शकतो. मात्र महिनाभर साठवायचा असेल तर त्यासाठी लागणारे गोदाम नागपुरात नाही. त्यामुळे आपल्याकडे या निर्णयाचा फारसा फायदा अथवा तोटा व्यापाऱ्यांना होणार नाही. कळमना बाजारात येणारी दररोजची आवक एकादिवसापुरती असते. येथूनच कांदा विदर्भात निर्यात करण्यात येतो असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा कांद्याची आवक कमी आहे. जुना कांदा बाजारात उपलब्ध नसून नवा कांदा कमी प्रमाणात आला आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात वाढले आहे. नवा कांद्याची प्रतीक्षा कायम असून तो मागणीच्या प्रमाणात न आल्यास कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असून सणासुदीच्या काळात दर आटोक्यात येणे शक्य वाटत नाही. – जयप्रकाश वासाणी,अध्यक्ष कांदा बटाटा बाजार कळमना