देवेश गोंडाणे
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या लिपिक टंकलेखक व करसाहाय्यक या संवर्गाच्या उमेदवारांनी पूर्व व मुख्य परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर त्यांची दुसऱ्यांदा टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात आली. परंतु, ही पात्रता परीक्षा असतानाही आयोगाने परीक्षेचे स्वरूप, शब्दमर्यादांचे निकष जाचक ठेवल्याने अनेक उमेदवार अपात्र ठरण्याचा धोका आहे.
‘एमपीएससी’तर्फे लिपिक टंकलेखक व कर सहायकांच्या १ हजार ४६४ जागांसाठी २०२१ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासून ही परीक्षा विविध कारणांची वादात सापडली आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची आयोगाने ७ एप्रिल २०२३ ला पहिली कौशल्य चाचणी घेतली. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रामध्ये तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन आयोगाने ती चाचणी रद्द ठरवली. त्यानंतर २४ मे रोजी परिपत्रकाद्वारे कौशल्य चाचणी ३१ मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले. याच्या तयारीसाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला. दुसऱ्या कौशल्य चाचणीमध्ये पहिल्या चाचणी परीक्षेत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक होते. मात्र, दुसऱ्यांदा झालेल्या चाचणी परीक्षेमध्येही वेळ आणि शब्दांचा नियम डावलून अधिकची शब्दमर्यादा देणे, चुकीचा ‘कीबोर्ड’ देणे अशा चुका झाल्या. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.
शब्दमर्यादेचा गोंधळ..
‘एमपीएससी’च्या जाहिरातीमध्ये एका तासाला ९ हजार शब्दमर्यादा असा नियम देण्यात आला. त्यानुसार दहा मिनिटांसाठी झालेल्या टंकलेखनासाठी १५०० शब्दमर्यादा अपेक्षित होती. टंकलेखनाच्या नियमानुसार पाच बटन दाबले असता त्याला एक शब्द समजले जाते. मात्र, ‘एमपीएससी’ने दिलेल्या उताऱ्यामध्ये पाच बटनांचा एक शब्द न समजता पूर्ण शब्दानुसार मोजणी केल्याने एका उताऱ्यामध्ये १५०० ऐवजी ती शब्दमर्यादा १९०० शब्दांवर गेली. त्यामुळे दहा मिनिटात ही शब्दमर्यादा पूर्ण करणे अशक्य होते. त्यामुळे आयोगाने सर्व उमेदवारांना सरसकट पात्र ठरवावे, अशी मागणी होत आहे.
अन्य आक्षेप..
’जाहिरातीमध्ये ‘रेमिंगटन’ मराठी ‘कीबोर्ड’ राहील असा नियम असताना ‘रेमिंगटन गेल’ हा हिंदूी ‘कीबोर्ड’ दिला.
’टायिपग करताना शब्द ठळक दिसतील व चुकीच्या शब्दांना लाल रंगाची रेष दिसेल असे सांगण्यात आले मात्र, परीक्षेदरम्यान तसे झाले नाही.
’काहींचे ‘कीबोर्ड’ मध्येच बंद पडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.