अमरावती : आंबिया बहाराच्या संत्र्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असल्यामुळे संत्री उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे किडींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र फळगळती सुरु आहे, तर कुठे कोळशी मोठ्या प्रमाणात पसरल्याने संत्रा फळांना काळे लालसर डाग पडत आहेत. बाग ताणावर असताना पडणाऱ्या पावसामुळे फळगळती सुरू होते आणि उत्पादकता प्रभावित होते.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड आहे. त्यातील सर्वाधिक ७० हजार हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर नागपूर आणि उर्वरित राज्यात क्षेत्र आहे. फवारणी केल्याने कोळशी कमी होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले होते. परंतु तसे केल्यानंतरही कोळशी कमी झालेली नाही. संत्र्याच्या झाडांची पाने पिवळी पडून झाडे वाळत आहेत. झाडावरच फळे पिवळी झालेली दिसत आहे. तरीदेखील शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन महागडी औषधी खरेदी करत आहेत. फायटोप्थोरा बुरशी समस्या वाढत असल्याने संत्र्याची गळतीही वाढत चालली आहे.

सध्या वातावरणात मोठे बदल होत आहेत. काही भागात अतिवृष्टी आणि काही भागात दुपारी अचानक तापमानात वाढ अशा विविध कारणांमुळे आंबिया बहरातील फळांची संत्रा फळगळ होत आहे. बुरशीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देखील फळगळ होत आहे. शेतात वराह, वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर फळांचे नुकसान करत आहेत. संत्र्यावर संशोधन करण्यासाठी संस्था, स्वतंत्र विभाग कार्यरत असतानाही संबंधितांकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन होताना दिसत नाही. तशी ओरड शेतकरी करीत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडे सध्या शेतीची बरीच कामे असल्याने शेतकरी वेळ देऊ शकत नाही, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने खते, कीटकनाशके, तणनाशके, त्यावर लादलेला जीएसटी यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलवर लादलेला अतिरिक्त कर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. संत्रा फळगळतीचे पंचनामे लवकर करुन अनुदान वितरित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आंबिया बहार फळपीक विम्यामध्ये झाडावरील फळ तोडणीपर्यंत ट्रिगर देण्यात यावा. तसेच यामध्ये वाऱ्याचा वेग हा सुद्धा ट्रिगर समाविष्ट करण्यात यावा.पुष्पक खापरे, सदस्य, फळपीक विमा समिती.

संत्र्याच्या बागेतील साडेचारशे झाडांपासून यंदा दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. पुढील पंधरा दिवसांत तोड होणार होती, पण अतिवृष्टीमुळे संत्र्याच्या झाडावर एकही फळ शिल्लक नाही. प्रवीण खुजे, शेतकरी, कऱ्होडी (सर्फापूर)