चंद्रपूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावाचे आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी व्यवस्थापनाने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करीत त्यांना तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहे.
निर्माणीत २४०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. येथे दारूगोळा आणि क्षेपणास्त्र तयार केले जातात. पिनाका, अर्जुन, शौर्य या क्षेपणास्त्रांची निर्मिती येथेच करण्यात आली.
सध्याची ताणावाची स्थिती पाहता दारूगोळा आणि क्षेपणास्त्र उत्पादनासही गती देण्यात आली आहे. ‘म्युनिशन इंडिया’ या नव्या रूपात बदललेल्या या उत्पादन केंद्रातून मोठ्या प्रमाणात दारूगोळा तयार केला जात असून, त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे.
कुणीही सुट्टीवर जाऊ नये, असे आदेश आहे. दारूगोळा उत्पादन वाढविण्यासंदर्भात सोमवारनंतर सूचना दिल्या जातील. युनियन व अधिकारी यांची आजच एक बैठक झाली.– विवेक वाढई, सदस्य, आयुध निर्माणी कामगार संघटना.