अनेक शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती करतात. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी स्थिती उदभवत असल्याने शेती परवडत नसल्याची ओरड वाढत चालली आहे. परंतू वाशीम येथील शेतकऱ्याने केवळ तीन एकरात पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने लालयपूरी खरबूजाची लागवड करून केवळ ८२ दिवसात लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या खरबुजाला काश्मीरच्या बाजारात चांगली मागणी मिळत असल्याने थेट शेतातून काढलेले खरबूज काश्मीर येथे पाठविले जात आहे.
शेती परवडत नसल्याची ओरड होत असतांना शेतकरी आता नवनवीन व बाजारात मागणी असलेल्या पिकांकडे वळत आहे. रासायनिक पध्दतीपेक्षा सेंद्रिय शेतीची गरज ओळखून नवनवीन प्रयोग शेतात राबविण्यात येत आहेत. असाच अनोखा प्रयोग वाशीम येथील शेतकऱ्यांने यशस्वी करुन दाखविला आहे. राधेश्याम मंत्री यांची शहरापासून जवळच असलेल्या तामसी सोनखास शेतशिवरात शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर लायलपुरी जातीच्या खरबुजची लागवड केली. लागवड केल्यानंतर ८२ दिवसात खरबुजाची तोडणी करुन हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीनं थेट जम्मू काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला. थेट शेतातूनच त्यांच्या चवदार खरबुजांना १७ रुपये प्रतिकिलो एव्हडा दर मिळाला आहे. येथील शेतकरी मंत्री यांनी त्यांच्या शेतातून पहिल्या तोडणीतून २० टनांचे खरबूज काढले तर आणखी १७ ते १८ टन उत्पादन काढले जाण्याचा अंदाज आहे. ज्यामधून त्यांना अंदाजे सहा ते सात लाखांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
रासायनिक खते, किटकनाशक विरहित शेती
शेतात रेड अँपल बोर लावली आहे. त्याच्या मधोमध लालयपुरी खरबुजाची लागवड केली आहे. मात्र झाडं सध्या लहान असल्याने आंतरपीक म्हणून पावसाळ्यात सोयाबीन आणि आता खरबुजाचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही रासायनिक खतं किंव्हा कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही त्यामूळे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने खरबूजाची लागवड केल्याने त्याची चवही अत्यंत गोड आहे.