नागपूर : करोनाकाळापूर्वी मेट्रोकडे पाठ फिरवणारे प्रवासी आता या सेवेकडे वळू लागले असून त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गावरची प्रवासी संख्या ४५ हजारावर गेली, असा दावा महामेट्रोने केला आहे.

नागपुरात मेट्रो सुरू झाल्यावर प्रवाशांच्या उडय़ा पडतील असा अंदाज सुरुवातीला होता. प्रत्यक्षात अनेक दिवस मेट्रोला प्रवासी मिळत नव्हते. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व  तत्सम सुटय़ांच्या दिवशी उत्सुकतेपोटी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांचा अपवाद सोडला तर प्रतिसाद अल्प होता. मात्र करोना काळ संपल्यावर व शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मेट्रोकडे प्रवाशांचा ओघ वाढला.

मेट्रोच्या वर्धा (ऑरेंज लाईन) आणि हिंगणा (एक्वा लाईन) या दोन्ही मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या ४५ हजारावर गेल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.  कामठी मार्गावरील सेवा सुरू झाल्यावर प्रवासी संख्येचा टप्पा एक लाखावर जाईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला आहे. परिस्थिती ज्याप्रमाणे सामान्य होते आहे त्याचप्रमाणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे.

दरम्यान, वर्धा मार्गाच्या तुलनेत हिंगणा मार्गावरील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. विशेषत:  शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी मेट्रोला प्राधान्य  देत आहे. किफायतशीर दर, मेट्रोतून सायकल नेण्याची सोय, पेट्रोलच्या दरात झालेली वाढ आणि वातानुकूलित सेवा यामुळे मोठय़ा संख्येने प्रवासी मेट्रोकडे वळताना दिसत आहेत.