बुलढाणा : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार संजय कुटे यांच्या जळगाव जामोद मतदार संघातील निष्ठावान कार्यकर्ते पंकज देशमुख यांचा संशयास्प मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांच्या पत्नी सुनीता पंकज देशमुख यांनी केली आहे.
सुनीता देशमुख यांनी पोलीस महानिरीक्षक अमरावती, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पतीच्या कथित आत्महत्येला सुमारे एक महिना झाल्यावर दिलेल्या या तक्रारीने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघसह भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे या घटनेला ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ जोडून सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पती आणि आपल्या दोन निराधार मुलांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. गेल्या ३ मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर व मानेवर अनेक जखमाही होत्या . जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाच शवविच्छेदन केले तरी पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा जळगाव जामोद परिसरात सुरू होती. मात्र आता पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची तक्रार केली आहे. सोबतच जळगाव जामोद पोलिसांचा तपास संशयास्पद असून जळगाव जामोद पोलिसांवर माझा विश्वास नाही असे म्हटले आहे.
मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पंकज देशमुख २२ वर्षापासून भाजप कार्यकर्ता व जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांचा वाहन चालक होता. त्यामुळे सुनिता देशमुख यांना नेमका कुणावर संशय आहे, याबाबत वेगवेगळया चर्चा सुरू आहेत. अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. बुलढाण्यातही तसेच काही घडत आहे का, याचा शोध घेण्याचे आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आहे.
मुख्यमंत्री साहेब, पहेलगाममध्ये महिलांचे कुंकू पुसले म्हणून “ऑपरेशन सिंदुर ” राबवले. येथे भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नीचे सिंदूर पुसल्या जात आहे, त्यासाठी काय करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.