पुणे : औषधांसाठी रेल्वे प्रवाशांना आता स्थानकाबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण स्थानकांवरच जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात ५० रेल्वे स्थानकांवर ही सुविधा सुरू होणार आहे. यात राज्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस, पिंपरी, मालाड, मनमाड, सोलापूर, नागभीड या सहा स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वेने कोट्यवधी प्रवासी दररोज प्रवास करतात. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देतानाच त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत रेल्वे मंत्रालयाकडून हा पथदर्शी प्रकल्प राबवविला जाणार आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानकावर प्रवाशांना जाण्यायेण्याच्या मार्गावर ही जनऔषधे केंद्रे सुरू केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात देशभरात ५० स्थानकांवर जनऔषधी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रात रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून दिली जातील.

हेही वाचा – Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेत अडथळे; तांत्रिक अडचणींमुळे दोन तास विलंब; ‘टीसीएस’ला कारणे दाखवा नोटीस

केंद्र सरकारने नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. स्थानकातच प्रवाशांना या केंद्रात औषधे मिळतील. प्रत्येक स्थानकावर जनऔषधी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर जागा दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक रेल्वे विभागाकडून ई-लिलाव केला जाईल. यातून रेल्वेला महसूलही मिळणार आहे. या जनऔषधी केंद्राची रचना अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनकडून केली जाणार आहे.

हेही वाचा – अबब! महिलेच्या पित्ताशयातून निघाले हजारांहून अधिक खडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनऔषधी केंद्रे

आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती स्थानक, सिकंदराबाद आसाममध्ये न्यू तिनसुकिया, लुमडिंग, रंगीया, बिहारमध्ये दरभंगा, पाटणा, कटिहार, छत्तीसगडमध्ये जंजगीर-नायला, बागबहारा, पेंड्रा रोड, दिल्लीत आनंद विहार, गुजरातमध्ये अंकलेश्वर, महेसाणा, झारखंडमध्ये सिनी जंक्शन, जम्मू व काश्मीरमध्ये श्रीनगर, कर्नाटकात एसएमव्हीटी बंगळुरू, बंगारपेट, म्हैसूर, हुबळी जंक्शन, केरळमध्ये पलक्कड, मध्य प्रदेशात रतलाम, मदन महाल, बीना, नैनपूर ओडिशातील खुर्दा रोड, पंजाबमध्ये फगवाडा, राजपुरा, राजस्थानमध्ये सवाई माधोपूर, भगत की कोठी, तमिळनाडूत तिरुचिरापल्ली जंक्शन, एरोड, डिंडीगुल जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, वीरांगणा लक्ष्मीबाई, लखनौ जंक्शन, गोरखपूर जंक्शन, बनारस, आग्रा कॅन्टोन्मेंट, मथुरा, उत्तराखंडमध्ये योग नगरी ऋषिकेश, काशीपूर, पश्चिम बंगालमध्ये माल्डा टाऊन, खरगपूर या ठिकाणी जनऔषधे केंद्रे सुरू होणार आहेत.